गोकुळवर चार संचालक नेमल्याने शिंदेसेना नाराज, धंगेकरांचा भाजपला इशारा
राज्य सरकारने गोकुळ दूध संघावर चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शिंदेसेनेनेही उघड नाराजी व्यक्त केली आहे.
गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गोकुळचं राजकारण चांगलंच तापलं आहे. कालपर्यंत काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेकडून सरकारवर टीका होत होती. आता त्यात शिंदेसेनेचीही भर पडली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून युतीतच जुंपल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
चार संचालक नेमल्याबद्दल शिंदेसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघाला लहान मुलासारखं वाढवलं आहे, या संघाचा आदर करा, लोकशाहीचा आदर करा, चिटिंग करू नका, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावलं.
धंगेकर म्हणाले की, लोकशाहीत जनतेचा कौल महत्त्वाचा असतो. जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा मान ठेवून कामकाज करावं लागतं. पण काही तरी त्रुटी ठेवण्याचा प्रयत्न करून निवडणुकीला विलंब लावला जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. उपाशी तापाशी राहून या संस्था वाढवलेल्या असतात आणि शेतकऱ्यांनी त्या मुलांसारख्या जपलेल्या असतात, असंही ते म्हणाले. म्हणूनच गोकुळमध्ये राजकारण न करता निकालाचा आदर राखला पाहिजे, सरकारने कमीत कमी हस्तक्षेप केला पाहिजे आणि संस्था टिकवली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. ओठावर एक आणि पोटात एक असं नको, जे पोटात आहे तेच ओठावर असलं पाहिजे, उलट्या हाताने खाण्यापेक्षा सरळ हाताने खाल्लेलं कधीही चांगलं, असंही धंगेकर यांनी भाजपला सुनावलं.
सहकाराच्या इतिहासाचाही त्यांनी उल्लेख केला. 1950 मध्ये विठ्ठलराव विखे पाटलांनी महाराष्ट्रात सहकार रुजवला. त्याला आता 70-80 वर्षं झाली आहेत. महाराष्ट्राने सहकारात मोठं योगदान दिलं असून अनेक सहकारी संस्थांशी जनतेची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे आताच्या काळात या संस्थेत इतका हस्तक्षेप करणं योग्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही सत्तेत असलो तरी लपून छपून बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही, सहकाराला मोकळीक दिली पाहिजे, असंही ते म्हणाले. राज्यात जे जे मुख्यमंत्री झाले, त्यांनी या संस्थांना ताकद दिली आणि वेळ पडली तेव्हा आर्थिक ताकदही दिली. पण गोकुळकडे पाहिल्यावर मनाला वाईट वाटतं, लोकशाही आहे की नाही असं वाटतं, असा उद्वेगही धंगेकर यांनी व्यक्त केला.
अशा निवडणुका निरपेक्ष झाल्या पाहिजेत, तो लोकशाहीचा विजय असतो, असं सांगून धंगेकर म्हणाले की, पूर्वी सहकारात सरकारचा हस्तक्षेप नव्हता, आता तो दिसत आहे. सहकारात पक्षीय राजकारण करू नये. शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्या हातात राहिली पाहिजे. राजकारण करून आणि हस्तक्षेप करून संस्थेला वेठीस धरू नये. या संस्था महाराष्ट्राच्या वाहिन्या आहेत, सरकारने त्यांना ताकद दिली पाहिजे आणि त्यांच्याकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, असंही ते म्हणाले. देशाच्या निवडणुकीपेक्षा गोकुळची निवडणूक मोठी झाली आहे, यात असं काय आहे, असा सवालही त्यांनी केला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.