गोकुळवर नाविद मुश्रीफ येणार नाहीत, चार संचालकांच्या चर्चेवर हसन मुश्रीफ यांचा खुलासा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सरकार गोकुळवर चार संचालक नेमणार असून त्यात आपला मुलगा नसेल, असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे मावळते चेअरमन नाविद मुश्रीफ यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांनाही बहुमत मिळालेले नाही. म्हणून सरकारने गोकुळवर चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
या चार संचालकांत नाविद मुश्रीफ यांचे नाव असण्याची चर्चा सुरू होती. चारांपैकी एक संचालक म्हणून ते गोकुळवर येणार, असे बोलले जात होते. बॅकडोअरने ते गोकुळवर येणार, अशी चर्चा चांगलीच रंगली होती. त्या सगळ्या चर्चेला हसन मुश्रीफ यांनी पूर्णविराम दिला आहे. माझा मुलगा गोकुळवर जाणार नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले.
गोकुळमधला डेडलॉक दूर करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे, असे मुश्रीफ म्हणाले. सरकारने हा कायदा आणला असला तरी माझा मुलगा किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा कोणीही गोकुळमध्ये संचालक होणार नाही, असे ते म्हणाले. माझ्या मुलाचा बॅकडोअरने प्रवेश होणार नाही. तिथे तज्ज्ञांचीच नियुक्ती होईल. कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या कार्यकर्त्याला सरकार गोकुळवर नेमेल, असे मला वाटते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली. सतेज पाटील यांच्याकडे बहुमत आहे ना, मग त्यांनी कोरम पूर्ण करावा आणि त्यांचा चेअरमन निवडावा. आम्ही त्यांना कुठे अडवले आहे, असा सवाल त्यांनी केला. पण त्यांना ते जमणारच नाही, कारण गोकुळच्या बायलॉजप्रमाणे आणि नियमांनुसार कोरम पूर्ण झाल्यावरच चेअरमन निवडला जातो. कोरम नसेल तर चेअरमनही निवडता येत नाही आणि मीटिंगही घेता येत नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
हा एका बायलॉजमुळे झालेला डेडलॉक आहे, पण विरोधक ते समजून घेत नाहीत, असे मुश्रीफ म्हणाले. त्यांनी त्यांचा चेअरमन निवडावा किंवा कोर्टात जावे, आम्ही त्यांना अडवलेले नाही. कोर्ट जो निर्णय घेईल, त्याचा आदर केला पाहिजे. आमची भूमिका अशी आहे की हा डेडलॉक कधी संपणार आणि निवडून आलेल्या लोकांच्या हातात सत्ता कशी जाणार, म्हणून हा निर्णय घेतला. सरकार प्रशासकही नेमू शकले असते, पण तसे केले नाही, असेही ते म्हणाले.
निवडणुकीतल्या प्रचारावरही मुश्रीफ यांनी बोट ठेवले. सोशल मीडियाचा वापर करून विखारी प्रचार करण्यात आला, असे ते म्हणाले. हा संघ एवढा मोठा नाही, पण सोशल मीडियावर तो प्रचंड मोठा असल्याचे दाखवले जात आहे. काँग्रेस पक्षात असलेल्या धर्मनिरपेक्ष पक्षातील लोकांनी माझ्या मुलाविरोधात जातीयवादी प्रचार केला, असा त्यांचा आरोप आहे. सोशल मीडियातून विष कालवले गेले, सभासदांमध्येही विष कालवले गेले, असे सांगत दोस्त दोस्त ना राहा, असेच म्हणावे लागेल, असे ते म्हणाले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.