सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
09:13 IST

कुणी रोप घेता का रोप? यावलमध्ये कांद्याच्या रोपांना मागणी नाही, शेतकरी मोफत द्यायलाही तयार

यावल तालुक्याच्या पश्चिम भागात कांदा लागवड अंतिम टप्प्यात आहे, पण पाणी आणि पैशांच्या अडचणीमुळे रोपे घ्यायला कोणी तयार नाही.

कुणी रोप घेता का रोप? यावलमध्ये कांद्याच्या रोपांना मागणी नाही, शेतकरी मोफत द्यायलाही तयार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

यावल तालुक्याच्या पश्चिम भागात कांदा लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगामातील एकूण लागवडीत सर्वाधिक क्षेत्र शेतकऱ्यांनी कांद्यासाठी ठेवले आहे. ही लागवड ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू झाली होती आणि आता ती शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

तरीही अजून बरेचसे क्षेत्र कांदा लागवडीविना आहे. पाण्याची टंचाई आणि पैशांची अडचण यामुळे शेतकऱ्यांना लागवड करता आलेली नाही. बहुसंख्य शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे विकत घेऊन रोपे तयार केली आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत ही रोपे कोणी विकत घ्यायला तयार नाही, त्यामुळे रोपांची दैना झाली आहे. रोपे फुकट द्यायची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली, तरी मोफतही कोणी शेतकरी ती घ्यायला येत नाही. आता ही रोपे फेकून देण्याच्या लायकीची झाली आहेत.

जून आणि जुलै महिन्यात ८०० ते ९०० रुपये किलो दराने कांदा बियाणे घेतले जाते. शेतात त्याची रोपे तयार करायची आणि रोपे तयार झाल्यावर शेतात लागवड करायची, असा शेतकऱ्यांचा नेहमीचा क्रम आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात १०० फूट लांब आणि तीन फूट रुंद आकाराच्या क्षेत्रातील रोपांची विक्री ३ हजार रुपयांना होत होती.

आता तेच रोप त्याच आकाराच्या क्षेत्रासाठी ७०० ते ८०० रुपयांना दिले जात आहे, पण तेही कोणी घेत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे मोफत द्यायचा निर्णय घेतला आहे. कोणीच घेतले नाही, तर शेवटी त्यावर वखर फिरवला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दुष्काळाची तीव्रता, पाण्याच्या पातळीत घट, आर्थिक संकट, कर्जबाजारीपणा आणि महागाईचा फटका अशी अनेक कारणे यामागे असल्याचे सांगितले जाते.

दहिगावचे शेतकरी भूषण माळी म्हणाले, "आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतो. कांद्याचे बियाणे विकत घेऊन रोप तयार करणे आणि शेतकऱ्यांना विकणे, तसेच आमच्या स्वतःच्या शेतातही लागवड करणे, हा आमचा शेती व्यवसाय आहे. पण यावर्षी रोप घ्यायला कोणीच तयार होत नसल्याने अखेर आम्ही मोफत द्यायलाही तयार आहोत. तरीही कोणी शेतकरी रोप न्यायला तयार नाही, अशी आमची परिस्थिती झाली आहे. शेवटी रोप उपटून किंवा त्यावर नांगर आणि वखर फिरवून ते फेकून देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत."

या सगळ्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे आणि पाणी योजनेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ