Vivo ने आणला X Fold6 फोल्डेबल फोन, 6900mAh बॅटरी आणि Jovi AI एजंट
Vivo ने आपला नवा फोल्डेबल फोन X Fold6 लाँच केला आहे. 6900mAh बॅटरी, 8.02 इंचाचा आतला डिस्प्ले आणि OriginOS 7 Fold ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.
Vivo ने आपला नवीन फोल्डेबल फोन X Fold6 लाँच केला आहे. हा फोन फक्त घडी होणारा नाही, तर त्यात अशी काही फीचर्स आहेत जी आजपर्यंत कुठल्याही कंपनीने दिली नाहीत, असे सांगितले जाते. सतत प्रवासात असणाऱ्या आणि कामात बिझी राहणाऱ्या लोकांसाठी, म्हणजेच बिझनेस करणाऱ्यांसाठी हा फोन एकदम परफेक्ट आहे, असे म्हटले आहे.
हा फोन Prism Blac आणि Horizon Blue अशा दोन रंगांत मिळतो. ब्लॅक रंगाचा फोन उघडल्यावर त्याची जाडी 4.4mm होते आणि वजन फक्त 228 ग्रॅम आहे. ब्लू रंगाचा फोन ब्लॅकपेक्षा थोडा जाड, म्हणजे 4.8mm, असून त्याचे वजन 235 ग्रॅम आहे. फोल्डेबल फोनमध्ये एवढा पातळ फोन मिळणे ही मोठी गोष्ट आहे.
बॅटरीच्या बाबतीत या फोनमध्ये 6900mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. एवढी मोठी बॅटरी असलेला हा Vivo चा पहिला फोल्डेबल फोन ठरला आहे. कंपनीने सिलिकॉन तंत्रज्ञान वापरले आहे, त्यामुळे पातळ बॉडीतही मोठी बॅटरी बसली आहे. ही बॅटरी 20 डिग्रीच्या थंडीतही चालते. फोनला 80W वायर्ड चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंग मिळते. वायरलेस चार्जिंगमुळे एका फोनने दुसरा फोन चार्ज करता येतो.
फोन उघडल्यावर आत 8.02 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो, तर बाहेरचा डिस्प्ले 6.51 इंचाचा आहे. दोन्ही डिस्प्ले 1Hz ते 120Hz पर्यंत आपोआप बदलतात आणि ब्राइटनेस 5000 निट्सपर्यंत जातो. त्यामुळे उन्हातही स्क्रीन एकदम क्लिअर दिसेल. प्रोसेसर म्हणून MediaTek चा Dimensity 9500 Super Edition दिला आहे. Vivo ने MediaTek सोबत मिळून तो खास X Fold 6 साठी बनवला आहे, त्यामुळे फोन एकदम फास्ट चालणार.
सॉफ्टवेअरसाठी कंपनीने OriginOS 7 Fold दिले आहे. त्यात एकाच वेळी 4 विंडो उघडून काम करता येते आणि एका App मधून दुसऱ्या App मध्ये फोटो किंवा माहिती ड्रॅग करून टाकता येते. AI मीटिंग असिस्टंट मीटिंगमध्ये कोण काय बोलले ते लिहून काढतो आणि शेवटी सारांशही बनवून देतो. व्हिडिओ कॉलला लाईव्ह सबटायटल येतात. फाईल्सना नाव देणे आणि त्यांचा सारांश बनवणे हे AI करते. PDF ई-बुकसारखी वाचायला सोपी करूनही देते.
फोनला मॉनिटर जोडला की तो डेस्कटॉपसारखा काम करेल. त्यात Jovi नावाचा AI एजंट आहे, जो माणसाच्या बोलण्यावरून काम करतो. मुख्य कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे आणि 3x पेरिस्कोप झूम 100x पर्यंत झूम करतो. मॅक्रो फोटोही यातूनच काढता येतात. फोटो प्रोसेस करण्यासाठी Vivo ची V3+ चिप आहे. मोशन पोर्ट्रेट 2.0 मुळे पळणारी मुले, कुत्रा किंवा मांजर यांचे फोटो क्लिअर येतात. कॉन्सर्टसाठी स्टेज मोड आहे आणि 4K व्हिडिओ 60fps वर Dolby Vision मध्ये रेकॉर्ड होतो.
मागच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढताना समोरच्या छोट्या स्क्रीनवर टेलिप्रॉम्प्टर दाखवता येतो. लहान मुलांनी कॅमेऱ्याकडे बघावे म्हणून त्या स्क्रीनवर कार्टून दाखवता येते. फोनला IPX8, IPX9 आणि IP5X रेटिंग आहे, म्हणजे पाणी आणि धुळीपासून सुरक्षा मिळते. गोठला तरी फोन खराब होत नाही, असे कंपनी सांगते. सिग्नलसाठी 1+4 चिपसेट आहे आणि 129 देशांत सिम न बदलता लोकल डेटा प्लॅन घेता येतो. एकूणच Vivo X Fold 6 हा फक्त फोन नाही, तर लॅपटॉप, कॅमेरा आणि पॉवरबँक सगळे एकत्र आहे.