विरारमधील घरफोडीचा छडा; १५ गुन्ह्यांतील सराईत घरफोड्या गजाआड
विरार पूर्वेतील भरदिवसाच्या घरफोडीत दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. गुन्हे शाखा कक्ष-३ ने आरोपीला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेऊन अटक केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विरार पूर्व भागात भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून तब्बल दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याच्या प्रकरणाचा छडा लागला आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-३ ला एका सराईत आंतरजिल्हा घरफोड्याला अटक करण्यात मोठे यश आले आहे.
आरिफ याकुब शेख (वय ३१, रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे तब्बल १५ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणातील फिर्यादी दीपक देऊ कुंभार (वय ५८) हे विरार पूर्व परिसरातील रहिवासी आहेत. १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी त्यांचे घर बंद होते. दुपारी २.३० ते २.४५ या केवळ पंधरा मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर बेडरूममधील कपाटाची तिजोरी उचकटून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २००००० रुपयांचा मुद्देमाल चोरून तो पळून गेला होता. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष-३ च्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तपास सुरू केला.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने थेट छत्रपती संभाजीनगर गाठले. तिथे सापळा रचून आरोपी आरिफ शेख याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने विरारमधील घरफोडीची कबुली दिली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
गुन्हे शाखा कक्ष-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक समीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे आणि प्रकाश तुपलोंढे, श्रेणी उपनिरीक्षक रामचंद्र पाटील, अंमलदार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे संतोष चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. या सर्वांच्या पथकाने मिळून हा तपास पूर्ण केला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.