विरारमध्ये बेकायदा फटाका कारखान्यावर पोलिसांचा छापा; तिघांविरोधात गुन्हा, १२ लाख ९८ हजार ५५० रुपयांचा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
विरार पूर्वेतील दाट नागरी वस्तीत परवान्याशिवाय सुरू असलेल्या फटाका कारखान्यावर गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ च्या पथकाने छापा टाकला. तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून १७ कामगार कारखान्यात आढळले.
विरार पूर्वेतील गजबजलेल्या परिसरात, दाट नागरी वस्तीत बेकायदा सुरू असलेल्या एका अनधिकृत फटाका कारखान्यावर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. गुन्हे प्रकटीकरण कक्ष-२ च्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत स्फोटक रसायने आणि कच्च्या मालासह १२ लाख ९८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
चंदनसार रस्त्यावर 'जी. एम. बेव्हरेज' कंपनीच्या शेजारी 'मर्चट एंटरप्रायझेस' नावाचे फटाक्यांचे दुकान आहे. या दुकानाच्या इमारतीतील वरच्या दोन मजल्यांवर कोणत्याही शासकीय परवान्याशिवाय आणि अग्निसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करून अत्यंत धोकादायक पद्धतीने फटाके तयार केले जात होते. हे तयार फटाके थेट तळमजल्यावरच्या दुकानातून बाजारात विकले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास छापा टाकला आणि हा सगळा गोरखधंदा उघडकीस आणला.
कारखान्यात तब्बल १७ कामगार अत्यंत असुरक्षित वातावरणात स्फोटक रसायने हाताळताना आढळून आले. नामांकित ब्रँडच्या नावाचा गैरवापर करून तिथे बनावट फटाके तयार केले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याशिवाय या धोकादायक कामात अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला होता का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी सुलतान मासुमअली मर्चेंट (वय ६५), सागर सुरेश पाष्टे (वय ३९) आणि देवेंद्र अजय नाईक या तिघांविरोधात विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नियमांनुसार फटाक्यांचे कारखाने मानवी वस्तीपासून सुरक्षित अंतरावर असणे बंधनकारक असते. या कारखान्यात किंचितही निष्काळजीपणा झाला असता आणि ठिणगी पडली असती, तर प्रचंड स्फोट होऊन शेकडो निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला असता.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली घातक रसायने, कच्च्या मालाचा पुरवठा, त्यामागील आर्थिक व्यवहार आणि आंतरजिल्हा नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी मुंबई दहशतवादविरोधी पथकाकडून सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी राजन सिंह यांनी केली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.