शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

वरोरा : बामनडोह नाल्यात रेती उपशावर रात्री धाड, चार ट्रॅक्टर जप्त, चार चालक पकडले

वरोरा : बामनडोह नाल्यात रेती उपशावर रात्री धाड, चार ट्रॅक्टर जप्त, चार चालक पकडले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

रानतळोधी गावाजवळच्या नाल्यात विनापरवाना रेती भरणाऱ्या चार ट्रॅक्टरवर वरोरा पोलिसांनी कारवाई केली. २८ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून चार चालक आणि चार मालकांवर गुन्हा दाखल आहे.

वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रानतळोधी गावाजवळ बामनडोह नाल्यात सुरू असलेल्या बेकायदा रेती वाहतुकीवर वरोरा पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली. नदीपात्रातून विनापरवाना रेती उपसणारे चार ट्रॅक्टर, त्यातील रेती आणि मजुरांचे साहित्य असा एकूण २८ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार चालक आणि चार ट्रॅक्टर मालक अशा आठ जणांवर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

वरोरा पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार आणि त्यांचे पथक ३० ऑक्टोबर २०२६ च्या सुमारास रात्री गस्तीवर होते. अवैध जुगार, प्रोव्हिहिशन्स आणि बेकायदा रेती उपसा यावर लक्ष ठेवण्यासाठी ही गस्त सुरू होती. त्या वेळी रानतळोधी गावाजवळच्या बामनडोह नाल्यात काही जण ट्रॅक्टर-ट्रॉलीतून बेकायदा रेती उपसून नेत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष, पंचांसह लपतछपत नाल्याच्या परिसरात धाड टाकली.

नाल्याच्या रेतीपात्रात पाहणी केली असता चार ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहताच रेती भरणारे मजूर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, पण ते हाती लागले नाहीत. मात्र ट्रॅक्टरवर बसलेले चार चालक जागेवरच रंगेहात पकडले गेले. नाव आणि पत्ता विचारल्यावर त्यांनी आपली नावे हरीदास राघोजी देशकर (वय ५०, रा. मजरा, ता. वरोरा), शंकर लक्ष्मण गेडाम (वय २९, रा. परसोडा, ता. वरोरा), अनिल नारायण उईके (वय ४०, रा. चिनोरा खदान, ता. वरोरा) आणि रोशन लिलेश्वर कुरजेकार (वय २६, रा. मजरा, ता. वरोरा) अशी सांगितली.

जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील असा आहे : महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल ११०४), लाल रंगाची ट्रॉली आणि रेती मिळून ७ लाख २ हजार ५०० रुपये. स्वराज ७४४ एक्सटी कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली मिळून ७ लाख २ हजार ५०० रुपये. आयशर ५५१ कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली (क्र. एमएच ३४ एल ५५१५) मिळून ७ लाख ५ हजार रुपये. आयशर ४८५ कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ बिव्ही ६९१२) आणि नीळ्या रंगाची ट्रॉली (क्र. एमएच ३४ एल ६६९१) मिळून ७ लाख २ हजार ५०० रुपये. याशिवाय ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्यासाठी वापरलेले १२ पादडे (किंमत २४०० रुपये) आणि १२ प्लास्टिक घमेली (किंमत ३००० रुपये) हेही जप्त झाले आहेत.

चौकशीत चालकांकडे वाळू उपशाचा परवाना किंवा कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. आपल्या मालकांनीच या घाटावर रेती उपशासाठी पाठवले, असे चालकांनी सांगितले. चालकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर मालक मनोज गजानन कुरजेकार (रा. मजरा), संजय बापु बल्लम (रा. सेंट ऍनेस कान्व्हेट मागे, वरोरा), सुधाकर रामदास वरभे (रा. गाडगेनगर, वरोरा) आणि ईश्वर रमेश भोंगडे (रा. मजरा) यांच्या सांगण्यावरून हा प्रकार सुरू होता.

पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार यांच्या फिर्यादीवरून वरोरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी चालक आणि मालक अशा एकूण आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) आणि महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या कलम ४८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. रात्री रेती घाटावर झालेल्या या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ