वर्क फ्रॉम होममुळे एकटेपणा आणि मानसिक तणाव वाढत असल्याचे अभ्यासात निरीक्षण
घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकटेपणा आणि मानसिक तणाव वाढल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.
घरातून काम करताना माणसाच्या अवतीभवती सहसा कोणी नसते आणि कामाच्या वेळेवर कसलेही बंधन उरत नाही. ऑफिसमध्ये जसे सहकारी डेस्कजवळ येऊन गप्पा मारतात किंवा चहा-कॉफी घेताना सहज बोलणे होते, तसे इथे होत नाही. अनेकांचा पूर्ण दिवस आता एकाच खोलीत जातो, तिथेच ते जेवतात, आराम करतात आणि झोपतातही. 'सायन्स' या विज्ञान मासिकात प्रकाशित झालेल्या एका ताज्या अभ्यासाने याबाबत इशारा दिला आहे, या जीवनशैलीमुळे एकटेपणा वाढणे, इतरांपासून तुटलेपणा वाटणे आणि मानसिक आरोग्य ढासळणे असे छुपे परिणाम होऊ शकतात. या अभ्यासाबद्दल कोच, हीलर, लाइफ अल्केमिस्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चांदनी तुगनाइट यांनी अधिक माहिती दिली आहे.
'होम अलोन: रिमोट वर्क, आयसोलेशन, अँड मेंटल हेल्थ' या नावाने झालेल्या या अभ्यासात कोविड-१९ महामारीनंतर घरून काम करण्याचा कर्मचाऱ्यांच्या सामाजिक जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला, याची तपासणी करण्यात आली.
संशोधक नतालिया इमॅन्युएल, एम्मा हॅरिंग्टन आणि अमांडा पॅलेस यांनी २०११ ते २०२४ या काळातील ५,८८,३२२ अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या डेटाचा अभ्यास केला. महामारीची भीती आणि प्रत्यक्ष घरून काम करण्याचे परिणाम यांतील फरक स्पष्ट व्हावा यासाठी संशोधकांनी २०२० आणि २०२१ या दोन वर्षांचा डेटा या अभ्यासातून वगळला.
अभ्यासानुसार, घरून काम करणाऱ्या लोकांनी एकटेपणा वाढल्याचे आणि मानसिक आरोग्य बिघडल्याचे सांगितले. या कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक आरोग्य सेवा, थेरपी किंवा औषधोपचारांचा वापर वाढल्याचेही दिसून आले. ज्यांना आधीच एकटेपणा जाणवत होता, त्यांच्यावर याचा सर्वाधिक परिणाम झाला.
घरून काम करणाऱ्या प्रत्येकालाच एकटेपणा जाणवतो असे नाही, असे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक जण संध्याकाळी कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत वेळ घालवतात. मात्र जे एकटे राहतात, त्यांच्यासाठी ऑफिस हीच अशी एकमेव जागा होती जिथे समोरासमोर बोलणे व्हायचे. घराने ऑफिसची जागा घेतल्यानंतर हा संवादच पूर्णपणे थांबला. यावरून असा अंदाज बांधण्यात आला आहे की, २०११ ते २०१९ या काळाच्या तुलनेत २०२२ ते २०२४ या काळात कर्मचाऱ्यांमध्ये वाढलेल्या एकटेपणा आणि मानसिक तणावापैकी जवळपास एक तृतीयांश वाटा घरून काम करण्याच्या वाढत्या सवयीचा असू शकतो.
या अभ्यासाचा अर्थ असा नाही की घरून काम करणाऱ्या प्रत्येकालाच नैराश्य येते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. घरून काम करण्याचे काही फायदेही नोंदवले गेले, प्रवासाचा वेळ वाचतो आणि वाहतूक कोंडीचा थकवा टाळता येतो, वेळेत लवचिकता मिळाल्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणे सोपे जाते, तसेच वैयक्तिक आयुष्य आणि काम यांच्यात चांगला ताळमेळ साधता येतो.
तज्ज्ञांच्या मते, ऑफिसमधील व्यस्त दिवसात होणारे पाच मिनिटांचे छोटे बोलणे तसे क्षुल्लक वाटू शकते, पण असे छोटे संवाद हळूहळू आयुष्यातून नाहीसे झाले की त्याचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. हा अभ्यास सलग पाच दिवस ऑफिसात जाण्याचा आग्रह धरत नाही, तर ऑफिस दैनंदिन आयुष्यातून वजा झाल्यावर सामाजिक संबंध कसे टिकवायचे, याचा शोध घेतो. यावरून एवढाच निष्कर्ष निघतो की, घरून काम करण्याची सोय हे आधुनिक आयुष्यातील मोठे वरदान आहे, पण मेंदू निरोगी राहण्यासाठी संवाद आणि इतरांशी जोडले जाण्याची गरज असते, हे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.