वर्धा पोलीस अधीक्षकांनी घेतली दुर्गा मंडळांची बैठक; शांत व सुरक्षित नवरात्रावर भर
नवरात्र उत्सव २०२६ शांततेत पार पडावा म्हणून वर्धा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील दुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कायदा, डीजे, लेझर लाईट आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या.
नवरात्र उत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी वर्धा जिल्ह्यातील दुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. वर्धा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ही बैठक झाली. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल हे बैठकीचे अध्यक्ष होते.
बैठकीत पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण, जिल्हाधिकाऱ्यांनी लेझर लाईटच्या वापरावर घातलेली बंदी आणि बीएनएसएस कलम १६३ नुसार डीजेच्या वापराबाबत काढलेले प्रतिबंधात्मक आदेश याबद्दल पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३६ व ३८ नुसार काढलेल्या आदेशांचे पालन करा, तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा, अशा सूचनाही दिल्या. आदेशांचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, हेही स्पष्ट सांगण्यात आले.
गरबा आणि दांडिया कार्यक्रमांचे नीट नियोजन, महिला व मुलींची सुरक्षा, मंडप व अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही, वाहतूक व पार्किंग, तसेच सोशल मीडिया आणि अफवांवर नियंत्रण या मुद्द्यांवरही सूचना झाल्या. नवरात्र उत्सव आणि गरबा दांडियासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेऊनच कार्यक्रम घ्यावेत, ध्वनीवर्धक ठरवून दिलेले नियम आणि वेळेच्या मर्यादेतच वापरावेत आणि बंदी असलेला लेझर लाईट वापरू नये, असे सांगण्यात आले. कार्यक्रमस्थळी पुरेशी प्रकाशयोजना, महिला स्वयंसेवक व सुरक्षा स्वयंसेवक आणि सीसीटीव्हीची सोय करावी, असेही सांगितले गेले.
महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि छेडछाड व गैरवर्तनाविरुद्ध "Zero Tolerance" धोरण ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसली किंवा काही अनुचित घडले, तर नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता लगेच पोलिसांना कळवावे, असेही सांगितले. सोशल मीडियावर अफवा, अप्रमाणित माहिती किंवा धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर पसरवू नये, आणि सामाजिक शांतता व सलोखा राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले.
पोलिसांशी समन्वय राहावा म्हणून "एक मंडळ एक जबाबदार पदाधिकारी एक पोलीस अंमलदार" ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक मंडळाने एका जबाबदार पदाधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि त्याने संबंधित पोलीस अंमलदाराशी नियमित संपर्कात राहावे, अशी सूचना दिली गेली.
यंदा वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून "नवदुर्गा सन्मान-२०२६" ही पुरस्कार स्पर्धा पोलीस ठाणे पातळीवर घेतली जात आहे. दामिनी पथक, महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती, नारीशक्ती व सामाजिक प्रबोधन, कन्या/महिला गौरव, महिला नेतृत्व व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, महिलांचे आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता, मुलींचे शिक्षण, करिअर व नेतृत्व विकास, सामाजिक बांधिलकी व समाजोपयोगी उपक्रम, पर्यावरण व स्वच्छता, सुरक्षित उत्सव व्यवस्थापन व पोलीस समन्वय, नाविन्यपूर्ण संकल्पना व एकूण आयोजन आणि "Save Water" संकल्पनेतील उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. या विषयांत उत्कृष्ट काम करणाऱ्या दुर्गा मंडळांना पोलीस ठाणे आणि जिल्हा पातळीवर बक्षीस देऊन गौरवले जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
"सुरक्षित नवरात्र" प्रत्यक्षात आणण्यासाठी पोलीस प्रशासन आणि दुर्गा मंडळे यांची संयुक्त जबाबदारी आहे, म्हणून सर्व मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. यावर्षी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दुर्गा मंडळांनी "Save Water" संकल्पना राबवून पाणी बचत आणि जलसंवर्धनाबद्दल जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणी व समस्यांचे निराकरण करून त्यांनी मार्गदर्शन केले आणि वर्धावासियांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
बैठकीला पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. प्रमोद मकेश्वर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक, तसेच वर्धा शहर, सेवाग्राम आणि सावंगी येथील ठाणेदार उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध दुर्गा मंडळांचे पदाधिकारीही हजर होते. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.