वर्ध्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकडून जनजागृती मोहीम
वर्धा बस स्टँड परिसरात अॅन्टी नार्कोटीक टास्क फोर्स वर्धाच्या वतीने विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
उद्याच्या भारताचा कणा समजल्या जाणाऱ्या तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वर्ध्यात एक विशेष मोहीम राबवण्यात आली. देशात जगातील सर्वांत जास्त तरुण लोकसंख्या असून भारताचे भविष्य याच पिढीच्या हातात आहे, असे या मोहिमेदरम्यान सांगण्यात आले. मात्र, आजची तरुण पिढी उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या एका राक्षसाच्या जबड्यात अडकत चालली आहे, आणि त्या राक्षसाचे नाव आहे व्यसन, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
ताणतणाव, नैराश्य किंवा अपयशापासून सुटका मिळवण्यासाठी काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन सुरू करतात, पण ही गम्मत कधी आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या व्यसनात रूपांतरित होते हे त्यांच्या लक्षातही येत नाही. अंमली पदार्थांचे सेवन आनंदाचे साधन नव्हे तर विनाशाला आमंत्रण देणारे आहे, आणि त्यामुळे शरीर आणि मनावर गंभीर परिणाम होऊन शरीर आतून पोकळ होते, असे या मोहिमेत सांगण्यात आले. यातून कॅन्सर, यकृताचे नुकसान, हृदयविकार आणि मानसिक संतुलन बिघडणे यांसारखे गंभीर आजार उद्भवतात, असेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय अंमली पदार्थांच्या सेवनाचा फटका फक्त संबंधित व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यालाच नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही बसतो, आणि यातून गुन्हेगारी प्रवृत्तीलाही चालना मिळते, असे या मोहिमेदरम्यान सांगण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर "Drugs Free Wardha" या संकल्पनेखाली सुरक्षित भविष्याची दिशा आणि नशामुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी अॅन्टी नार्कोटीक टास्क फोर्स वर्धाच्या वतीने वर्धा बस स्टँड परिसरात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना एकत्र आणून अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच त्या वेळी बस स्थानकावर उपस्थित असलेले सर्वसामान्य नागरिक हजर होते. जनजागृती मोहिमेदरम्यान विद्यार्थी आणि नागरिकांना अंमली पदार्थांबाबत सविस्तर माहिती देऊन जागृत करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना अंमली पदार्थ किंवा अवैध व्यवसायाबाबत कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना कळवण्याचे आवाहनही करण्यात आले.
ही अंमली पदार्थ विरोधी जनजागृती (Drugs Free Wardha) मोहीम वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.