मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:26 IST

वाईत बजाज चेतक खरेदी करून साडेतीन महिने झाले, गाडीचे पासिंगच नाही

वाई येथील स्वामी मोटार्स या बजाज कंपनीच्या अधिकृत डीलरकडून इलेक्ट्रिक चेतक घेतलेल्या ग्राहक महिलेला वाहनाचे पासिंग मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

वाईत बजाज चेतक खरेदी करून साडेतीन महिने झाले, गाडीचे पासिंगच नाही
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

वाई येथे राहणाऱ्या सौ. प्रमिला चव्हाण यांनी २९ मे २०२६ रोजी स्वामी मोटार्स या बजाज कंपनीच्या अधिकृत डीलरकडून इलेक्ट्रिक बजाज चेतक ही दुचाकी विकत घेतली. मात्र साडेतीन महिने उलटूनही या गाडीचे पासिंग अजून झालेले नाही, अशी तक्रार त्यांनी केली आहे. डीलरने वारंवार आश्वासने दिली, पण नोंदणीचे काम मात्र पूर्ण झालेले नाही, त्यामुळे आपली मोठी गैरसोय होत असल्याचे सौ. चव्हाण सांगतात.

गाडीची डिलिव्हरी घेताना डीलरने पुढे सलग सुट्ट्या असल्याचे कारण सांगितले होते. "तुम्ही गाडी घेऊन जा, मी पासिंग करून घेतो," असे आश्वासन त्यावेळी डीलरने दिल्याचे सौ. चव्हाण यांनी सांगितले. या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी गाडी ताब्यात घेतली. पण त्यानंतर पासिंगसाठी वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

पासिंगबाबत फोन केला की डीलरकडून वेगवेगळी कारणे पुढे केली जात, असे सौ. चव्हाण यांनी सांगितले. कधी "मी आजारी आहे, दवाखान्यात आहे" असे सांगितले गेले, तर कधी "माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली आहे" असे कारण देण्यात आले. एकदा तर "तुमच्या पासिंगसाठी सातारला आलो आहे," असेही सांगण्यात आले. या दरम्यान डीलरने दोन वेळा फोन करून पासिंगसाठी ओटीपी मागितला. सौ. चव्हाण यांनी ओटीपी दिल्यानंतर दोन दिवसांनी नंबरप्लेट बसवून जा, असे सांगण्यात आले. पण त्यानंतरही पासिंग पूर्ण झाले नाही, असा त्यांचा आरोप आहे.

गाडी खरेदी केल्यापासून साडेतीन महिने झाले तरी पासिंगसाठी पाठपुरावा सुरूच असल्याचे सौ. चव्हाण सांगतात. वाहनाची नोंदणी, आवश्यक कागदपत्रे आणि नंबरप्लेट याबाबत ग्राहकाला स्पष्ट माहिती देणे गरजेचे असताना, केवळ आश्वासने देऊन काम पूर्ण न झाल्याने ग्राहक म्हणून मोठी अडचण होत असल्याचे त्या म्हणाल्या.

सरकारी नियमांनुसार वाहनाची नोंदणी व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच गाडी ग्राहकाच्या ताब्यात द्यायला हवी. मग पासिंग न झालेली गाडी आपल्याला कशी देण्यात आली, असा प्रश्न सौ. चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. नोंदणी प्रलंबित असताना गाडी वापरायला देणे योग्य आहे का, याची संबंधित विभागाने चौकशी करावी, तसेच पासिंगची जबाबदारी असलेल्या डीलरकडून ही गैरसोय का झाली, याचे स्पष्टीकरण कंपनीने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

पासिंग प्रलंबित असताना रस्त्यावर गाडी चालवताना अपघात झाला किंवा काही अनुचित घडले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा गंभीर सवालही सौ. चव्हाण यांनी केला. "बजाज कंपनीच्या अधिकृत डीलरकडून गाडी घेऊनही साडेतीन महिन्यांपासून पासिंगसाठी पाठपुरावा करावा लागत आहे. डीलरने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून गाडी घेतली, पण अजून पासिंग झालेले नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?" असे त्या म्हणाल्या.

या प्रकरणाची संबंधित परिवहन विभागाने चौकशी करून गाडीचे पासिंग तातडीने करून द्यावे, तसेच ग्राहकांना गाडी खरेदीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे, नोंदणीची स्थिती आणि वाहन वापराबाबत स्पष्ट माहिती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सौ. प्रमिला चव्हाण यांनी केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ