शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

"नीट बोल" म्हणण्याचा दबाव मुलांची तोतरेपणाची भीती वाढवतो, नायरच्या डॉक्टरांचे म्हणणे

"नीट बोल" म्हणण्याचा दबाव मुलांची तोतरेपणाची भीती वाढवतो, नायरच्या डॉक्टरांचे म्हणणे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
तब्येत PT24 टीम

आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जनजागृती दिनानिमित्त नायर रुग्णालयाच्या स्पीच थेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती माहिते यांनी मुलांशी बोलताना घ्यायच्या काळजीकडे लक्ष वेधले.

"नीट बोल", "अडखळू नकोस", "काय बोलतोयस ते व्यवस्थित सांग" असे शब्द मुलांना सहज म्हटले जातात. पण हेच शब्द कधीकधी मुलांच्या मनात बोलण्याचीच भीती बसवू शकतात. २२ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जनजागृती दिनानिमित्त हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

एखादे मूल भाषा शिकताना अडखळत असेल आणि त्याला सतत टोकले, चिडवले किंवा ओरडले गेले, तर त्याचा आत्मविश्वास डळमळू शकतो. पुढे बोलताना पुन्हा अडखळू का, या विचाराने त्याचे बोलणे आणखी अडखळू शकते. त्यामुळे तोतरेपणाकडे केवळ बोलण्यातला दोष म्हणून न पाहता, तो व्यक्तीच्या आत्मविश्वासाशी जोडलेला प्रश्न आहे हे लक्षात घ्यायला हवे, असे यात म्हटले आहे.

तोतरेपणा म्हणजे बोलताना शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होणे, आवाज लांबवणे किंवा बोलण्यात अडथळे येणे. लहान मुलांमध्ये भाषा शिकण्याच्या टप्प्यावर अडखळणे दिसू शकते. पण ते प्रत्येक वेळी तोतरेपणाचे लक्षण असतेच असे नाही. अडखळण्याचे स्वरूप, ते किती काळ टिकते आणि त्याचा संवादावर काय परिणाम होतो, याचे तज्ज्ञांकडून मूल्यमापन होणे महत्त्वाचे आहे.

नायर रुग्णालयाच्या ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती माहिते यांच्या म्हणण्यानुसार, बोलताना श्वास, आवाज आणि उच्चार यांच्यात योग्य समन्वय लागतो. त्यात अडथळा आला तर बोलण्यात अडखळणे दिसू शकते. वाईट अनुभव, लोकांसमोर बोलण्याची भीती किंवा पूर्वी झालेली चेष्टा यांमुळे मानसिक दडपण वाढू शकते. काहींना अनोळखी माणसांसमोर बोलताना अडचण येते, तर काहींना ओळखीच्या माणसांसमोरही ताण येतो.

तोतरेपणासह बोलण्याच्या वेगवेगळ्या अडचणींवर स्पीच थेरपीने काम केले जाते. नायर रुग्णालयात रोज स्पीच थेरपीची ओपीडी चालते आणि तिथे किमान ५० ते ६० रुग्णांना थेरपी दिली जाते. नियमित उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांसोबत नवे रुग्णही येतात. खासगी रुग्णालयांत उपचार घेऊनही हवी तशी मदत न मिळाल्याने नायरमध्ये आलेले रुग्णही त्यात आहेत.

केवळ तोतरेपणाच नाही, तर लकवा आल्यामुळे बोलण्यात अडचण झालेले रुग्ण, ओठ फाटलेले असल्याने बोलण्यावर परिणाम झालेले रुग्ण आणि इतर संवादाच्या समस्या असलेल्यांनाही स्पीच थेरपीची गरज लागते. त्यामुळे या उपचारांचे महत्त्व फक्त स्पष्ट बोलण्यापुरते नाही. व्यक्तीला पुन्हा संवाद साधता यावा आणि रोजच्या आयुष्यात आत्मविश्वासाने सहभागी होता यावे, यासाठीही ते आहे.

डॉ. ज्योती मोहिते यांनी सांगितले की स्पीच थेरपीबद्दल माहिती नसल्याने उपचारांसाठी उशिरा येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. थेरपीत काही तंत्रे दिली जातात आणि सत्रांमधून सराव करून घेतला जातो. नायर हे ६० वर्षांपूर्वी स्थापन झालेले स्पीच थेरपी केंद्र असून आग्नेय आशियातील पहिले केंद्र आहे, असे त्यांनी सांगितले.

स्पीच थेरपी शिकवणारी केंद्रेही कमी आहेत, याची प्रशासनाने दखल घ्यावी, असे डॉ. मोहिते म्हणाल्या. राज्यात नायर, आलियावर जंग आणि भारती विद्यापीठ अशी तीनच केंद्रे आहेत. कुटुंबात कोणी अडखळत बोलत असेल आणि थेरपीत सातत्य ठेवले, तर ती व्यक्ती न अडखळता बोलू शकते, असे त्यांनी सांगितले. प्रशासन आणि पालक दोघांमध्येही जागरूकता हवी, असेही त्यांनी नमूद केले.

#नागपूर#सेहत#PT24#Health#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ