अमरावती-नागपूर महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघा तरुणांचा जागीच मृत्यू; बाळाच्या जन्माआधीच वडिलांचे छत्र
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
तिवसा तालुक्यातील वरखेड फाट्याजवळ भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने निखिल बोके आणि कैलास कळंबे यांचा मृत्यू झाला. ट्रॅव्हल्स चालक पोलिसांच्या ताब्यात आहे.
अमरावती-नागपूर महामार्गावर तिवसा तालुक्यातील वरखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला.
निखिल बोके आणि कैलास कळंबे अशी मृत झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही उंबरखेड येथे राहणारे होते. तिवसा येथून आपल्या गावी जात असताना हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाई सुरू केली. ट्रॅव्हल्सच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेला आणखी एक दुःखद बाजू आहे. कैलास यांच्या पत्नी आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत आणि पुढच्या महिन्यात त्यांची प्रसूती होणार होती. मात्र बाळाचा जन्म होण्याआधीच त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून उंबरखेड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विदर्भातच भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात आणखी एक दुर्दैवी घटना घडली. तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील आदर्श हायस्कूलमध्ये गुरुवारी एक विद्यार्थी वर्गातील मित्रांसोबत शाळेच्या छतावर कबड्डीचा सराव करत होता. तिथून उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्या वाहिनीच्या जिवंत तारांना स्पर्श झाल्याने त्याला जबर विजेचा धक्का बसला.
गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. काल सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अर्णव शेंद्रे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो 14 वर्षांचा होता. शाळेच्या इमारतीवरून जिवंत वीजवाहिनीच्या तारा गेलेल्या असल्यामुळे ही दुर्घटना घडली. अर्णव उत्कृष्ट कबड्डीपटू होता आणि अभ्यासातही अतिशय हुशार मुलगा म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातही एक घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील चांदगाव येथे 4 वर्षांच्या मुलावर वाघाच्या बछड्याने हल्ला करून त्याला जखमी केले. मयंक वलके हा चिमुकला आपल्या चुलत भावासोबत गावातच राहणाऱ्या आत्याकडे जात होता. त्यावेळी आत्याच्या घराजवळच बछड्याने त्याच्यावर झडप घातली.
त्याच वेळी चुलत भावाने प्रसंगावधान राखून जोरजोरात ओरडायला सुरुवात केली आणि त्यामुळे वाघाने पळ काढला. चुलत भावाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळेच मयंकचा जीव वाचला. जखमी मुलाला उपचारासाठी ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात सध्या भीतीचे वातावरण आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.