तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना ऑडिओ स्वरूपात माहिती मिळणार
मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर क्यूआर कोड स्कॅन केला की गडाचा इतिहास ऑडिओतून ऐकता येणार आहे.
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध तिकोना किल्ला, म्हणजेच वितंडगड, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आता नवी सोय करण्यात आली आहे. गडाचा इतिहास, तिथल्या ऐतिहासिक वास्तू आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती सहज मिळावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.
गडावर लावलेला क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केला की तिकोना गडाचा इतिहास ऑडिओच्या रूपात ऐकता येणार आहे. त्यामुळे गडभ्रमंतीचा अनुभव अधिक माहितीपूर्ण होणार आहे. गडाची वेगवेगळी ठिकाणे आणि गडाचा इतिहास पर्यटकांना सांगण्यासाठी याआधी पारंपरिक पद्धतीने माहिती उपलब्ध होती. आता त्याच्या जोडीला ऑनलाइन ऑडिओ बुक तयार करण्यात आले आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांना ही संबंधित ऐतिहासिक माहिती मोबाईलवर ऐकता येईल.
तिकोना किल्ल्याला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देतात. मात्र गडावरील वास्तूंचे महत्त्व, त्यामागचा इतिहास आणि गडाशी जोडलेल्या अनेक घटनांची माहिती अनेक पर्यटकांना प्रत्यक्ष गड पाहताना मिळत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन क्यूआर कोडच्या मदतीने माहिती उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
ही माहिती २४ तास उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार गडाचा इतिहास ऐकता येईल. गडावर कोणत्याही वेळी आलेल्या पर्यटकाला क्यूआर कोड स्कॅन करून ऐतिहासिक माहिती मिळवता येईल. विशेष म्हणजे, गडावरील वेगवेगळ्या ठिकाणी ही माहिती गाठण्यासाठी आधुनिक डिजिटल माध्यमाचा उपयोग केला आहे.
या ऑनलाइन ऑडिओ बुकच्या निर्मितीसाठी एआय फाउंडेशन आणि नेटक्रिएटर टेक्नॉलॉजी यांनी संयुक्तपणे आधुनिक तंत्रज्ञान वापरले. तिकोना गडाचा इतिहास आणि उपलब्ध माहिती अधिक प्रभावीपणे पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. पुढच्या काळात तिकोना गडाचा इतिहास तसेच इतर ऐतिहासिक स्थळांची माहिती अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. त्यामुळे गडभ्रमंतीसोबतच पर्यटकांना इतिहास समजून घेण्याची आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव होण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमातून तिकोना गडाच्या इतिहासाचे जतन आणि प्रसार होईलच, शिवाय तरुण पिढीला गड-किल्ल्यांच्या इतिहासाशी जोडण्याचाही प्रयत्न केला जात आहे. माहिती डिजिटल माध्यमातून मिळणार असल्याने राज्यातील तसेच परराज्यातील पर्यटकांनाही त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
या उपक्रमाच्या वेळी तनीर इनामदार, प्रिया जोशी, सुहास गाडेकर, विनोद गोरे, अभिजित पाटील, नितीन भगवत, पियुष कुंभार, संतोष सावळे, किरण चिमटे आणि इतर जण उपस्थित होते.