ठाण्यात प्रभाग 22 मधील कोंडीवर उपाय हवा; नगरसेविका उषा वाघ यांचे प्रशासनाला निवेदन
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिवाळीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 22 मधील अनधिकृत टपऱ्या, बेवारस वाहने आणि बेकायदेशीर रिक्षा थांब्यांवर महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी केली आहे.
दिवाळीच्या तोंडावर ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील अनधिकृत टपऱ्या, बेकायदेशीर वाहनतळ, बंद पडलेली बेवारस वाहने आणि अनधिकृत रिक्षा थांबे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी केली आहे. यासाठी त्यांनी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस विभागाला निवेदन दिले आहे.
वाघ यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 22 मधील खारटन रोड, चेंदणी कोळीवाडा आणि बाजारपेठ परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. या भागातून ठाणे परिवहन सेवा (TMT) आणि नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा यांची वाहतूक सुरू असते. त्याशिवाय भिवंडी, कशेळी आणि काल्हेरकडे जाणाऱ्या रिक्षा व टॅक्सींचीही मोठ्या प्रमाणात ये-जा असते. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्याचा स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भिवंडी, कशेळी आणि काल्हेर मार्गावर धावणारे रिक्षा व टॅक्सीचालक मनमानी पद्धतीने गाड्या उभ्या करतात, असा आरोप उषा वाघ यांनी केला आहे. चेंदणी कोळीवाडा परिसरात जेमतेम दोन रिक्षा उभ्या राहतील एवढीच जागा आहे. तरीही चालक तिथे तिसरी रांग लावतात, आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. या प्रकारांवर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नाही, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोंडीमुळे गाड्यांचे सतत वाजणारे हॉर्न आणि वाहनांतून निघणारा धूर यांचा परिसरातील रहिवाशांना त्रास होतो आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण वाढत असून लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अस्थमा आणि श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांना या परिस्थितीचा जास्त त्रास होऊ शकतो, अशी चिंता वाघ यांनी व्यक्त केली.
दिवाळीच्या काळात बाजारपेठ आणि आसपासच्या परिसरात नागरिकांची गर्दी वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. म्हणूनच महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी मिळून संयुक्त कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. अनधिकृत टपऱ्या हटवाव्यात, बेवारस आणि बंद अवस्थेतील वाहने उचलावीत आणि बेकायदेशीर रिक्षा थांब्यांवर कारवाई करून वाहतुकीला शिस्त लावावी, असे नगरसेविका उषा विशाल वाघ यांनी म्हटले आहे.
या निवेदनाची प्रत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, आमदार संजय केळकर, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मीनल संख्ये आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनाही देण्यात आली आहे, असे वाघ यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.