ठाणे-बेलापूर मार्गावर उद्यापासून रात्री वाहतूक बंद, एमएमआरडीएच्या गर्डरच्या कामामुळे पर्यायी मार्ग जाहीर
ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामासाठी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरून रात्री प्रवास करणाऱ्यांना उद्या वेगळा रस्ता धरावा लागणार आहे. या मार्गावरची वाहतूक रात्रीच्या वेळी बंद ठेवली जाणार आहे. एमएमआरडीएने एक महत्त्वाचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे हा निर्णय झाला आहे.
ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पात एका पुलाचे गर्डर बसवायचे आहेत. या कामासाठी उद्या तसेच 9 ते 11 ऑक्टोबर या दिवसांत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहील. याच काळात ठाणे-बेलापूर मार्गावर वाहने उभी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वेगवेगळे पर्यायी मार्ग ठरवले आहेत. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांनी आणि वाहनचालकांनी याच मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस विभागाने केले आहे. तसेच परिसरात तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.
बेलापूरकडे जाणाऱ्या सहा चाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांसाठी दिघा येथील मुकुंद कंपनीपासून एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. चारचाकी वाहनांनी भारत बिजली चौकातून उजवीकडे जावे, मग ऐरोली फायर ब्रिगेड चौकातून डावीकडे वळून खेडेकर चौकाच्या मार्गाने पुढे जावे, असा रस्ता मोकळा ठेवण्यात आला आहे.
ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्यांनी रबाळे नाका सिग्नलपासून उजवीकडे वळावे आणि एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्याने मुकुंद कंपनीमार्गे पुढे जावे. पटणीमार्गे जाणाऱ्यांसाठी रबाळे नाका, दिवागाव सर्कल आणि पटणी रोड हा मार्ग उपलब्ध राहील.
या बंदचा फटका प्रवाशांना बसणार आहे. मात्र प्रवाशांसाठी रेल्वे हा चांगला पर्याय ठरेल. रात्री 11 नंतर ठाणे ते वाशी ते पनेवल असा प्रवास करायचा असेल, तर ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन हा सर्वात वाहतूक कोंडीमुक्त आणि सुरक्षित पर्याय असेल, असे सांगण्यात आले आहे.
एमआयडीसीचे अंतर्गत रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत किंवा वळणावळणाचे आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून गूगल मॅपचा वापर करावा आणि लाईव्ह ट्रॅफिक पाहूनच प्रवास करावा, असेही सुचवण्यात आले आहे.