मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:31 IST

सुपर एल निनोचा इशारा: सहा महिन्यांत उष्णतेमुळे जगभरात 4.51 लाख मृत्यूंची भीती

शिकागो विद्यापीठाच्या क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या अहवालानुसार सप्टेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान उष्णतेमुळे जगभरात आणि भारतातही मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सुपर एल निनोचा इशारा: सहा महिन्यांत उष्णतेमुळे जगभरात 4.51 लाख मृत्यूंची भीती
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

जगभरातील हवामानात होणारे अनपेक्षित बदल आणि त्यातील लहरीपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच एल निनो या नैसर्गिक हवामान घटकाने वैज्ञानिक आणि संशोधकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आगामी काळात याचे 'सुपर एल निनो' असे भयानक रूप पाहायला मिळू शकते, असे एका अहवालात म्हटले आहे. सप्टेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या सहा महिन्यांत अतिउष्णतेमुळे जगभरात लाखो लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. हे हवामान बदलाचे संकट केवळ पर्यावरणापुरते मर्यादित न राहता थेट माणसांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे.

शिकागो विद्यापीठाच्या क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने याबाबत नवीन आणि व्यापक अभ्यास जाहीर केला आहे. या अभ्यासानुसार, सध्याचा सुपर एल निनो जसजसा अधिक शक्तिशाली होईल तसतसे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत जाईल. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या या अंदाजानुसार, सप्टेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या काळात जगभरात सामान्य वर्षाच्या तुलनेत तब्बल 4.51 लाख (4,51,000) अतिरिक्त उष्णता-संबंधित मृत्यू होण्याची भीती आहे. हा आकडा नेहमीच्या वर्षांतील मृत्यूंपेक्षा खूपच जास्त असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

याच अभ्यासानुसार, एल निनोच्या प्रभावामुळे जगभरातील जमिनीचे तापमान सामान्यपेक्षा 1.2 अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. यामुळे नेहमीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 44 टक्के जास्त अतिउष्ण दिवस अनुभवायला मिळू शकतात. संशोधकांच्या मते, ही परिस्थिती पुढच्या वीस वर्षांनंतर जगाचे तापमान कसे असेल, याची जणू आधीच झलक दाखवत आहे.

या जागतिक संकटात भारत आणि उत्तर गोलार्धातील इतर देश विशेष संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अभ्यासानुसार, सप्टेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत भारतात सुमारे 15,800 अतिरिक्त उष्णता-संबंधित मृत्यू होऊ शकतात, यामध्ये जवळपास 1,600 इतका अनिश्चिततेचा फरक गृहीत धरण्यात आला आहे. भारतासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी हे हिवाळ्याचे तीन महिने विशेष महत्त्वाचे असणार आहेत, कारण भारतातील अंदाजित मृत्यूंपैकी जवळपास निम्मे, म्हणजे सुमारे 7,400 मृत्यू याच काळात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील उन्हाळ्यात भारतासारख्या उत्तर गोलार्धातील देशांत ही स्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

इंडोनेशियात सुमारे 19,300 आणि फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलंड व कंबोडिया या दक्षिण-पूर्व आशियाई देशांत मिळून सुमारे 19,400 अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज आहे. आफ्रिकेतील साहेल क्षेत्रात, म्हणजे नायजेरिया, सुदान, नायजर आणि चाड या देशांत मिळून हा आकडा 66,800 पर्यंत जाऊ शकतो, त्यापैकी एकट्या नायजेरियात 31,400 मृत्यूंची भीती वर्तवण्यात आली आहे. ब्राझीलमध्येही अतिउष्णतेमुळे सुमारे 13,300 जणांच्या जिवाला धोका असल्याचे या अभ्यासात नमूद आहे.

जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) आणि अमेरिकेच्या नोआ या संस्थेने एल निनो अधिक तीव्र होत असल्याचा इशारा आधीच दिला होता. फेब्रुवारी 2027 पर्यंत एल निनो कायम राहण्याची शक्यता जवळपास 100 टक्के असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे, त्यामुळे हा धोका दीर्घकाळ राहू शकतो. कॉपरनिकस या संस्थेच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट 2026 मधील जगाचे सरासरी पृष्ठभाग तापमान 16.96 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे आतापर्यंतचा सर्वात उष्ण ऑगस्ट महिना ठरला आहे. हे तापमान औद्योगिकीकरणापूर्वीच्या सरासरीपेक्षा तब्बल 1.65 अंश सेल्सिअसने जास्त होते. ऑगस्टमध्ये निनो 3.4 क्षेत्रातील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा 1.8 अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले, तर पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक क्षेत्रात हा फरक 3 अंश सेल्सिअसच्याही वर गेला होता, असे कॉपरनिकसच्या आकडेवारीत म्हटले आहे.

क्लायमेट इम्पॅक्ट लॅबचे सहसंस्थापक मायकेल ग्रीनस्टोन यांनी सांगितले की, आतापर्यंत हवामानाचा परिणाम पिकांवर किती होतो हे मोजले जात होते, पण आता माणसांच्या जिवावर होणाऱ्या या गंभीर परिणामांचेही अंदाज समोर येत आहेत. ही आकडेवारी केवळ भीती निर्माण करणारी नसून धोरणकर्त्यांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, असा इशारा असल्याचे त्यांनी नमूद केले. हा धोका टाळण्यासाठी उष्णतेच्या लाटेपूर्वी नागरिकांना सतर्क करणारी यंत्रणा उभी करणे, सार्वजनिक ठिकाणी थंड हवेचे कक्ष आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणे, उन्हात काम करणाऱ्या मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल करणे आणि रुग्णालयांमध्ये उष्माघातावरील उपचारांसाठी विशेष सुविधा तयार ठेवणे गरजेचे असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ