झोपेतून उठल्यावर हातपाय बधीर होतात? दुर्लक्ष करू नका, ही असू शकतात कारणे
सकाळी उठल्यानंतर हातापायांत सुन्नपणा किंवा मुंग्या येण्यामागे काय कारणे असू शकतात आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, याबद्दल माहिती.
राहणीमानात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. सतत काम, पोषक घटकांची कमतरता, पाणी कमी पिणे, व्यायाम न करणे अशा अनेक कारणांमुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. यातलंच एक म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर जाणवणारा बधीरपणा. काहींना हातात मुंग्या आल्यासारखं वाटतं, तर काहींच्या पायात वेदना होतात किंवा हातपाय सुन्न पडल्यासारखे वाटतात.
बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे नसांवर तात्पुरता दाब येतो आणि थोड्या वेळाने वेदना आपोआप कमी होतात. पण सकाळी उठल्यावर वारंवार असा बधीरपणा जाणवत असेल, तर त्यामागे मणक्याच्या समस्या, कार्पल टनेल सिंड्रोम, मधुमेहामुळे होणारी न्यूरोपॅथी किंवा विटामिन बी १२ ची कमतरता अशी कारणे असू शकतात.
शरीरातील नसा मेंदू आणि इतर अवयवांना जोडलेल्या असतात. या नसा जणू संवेदनांचे संदेश वाहून नेणाऱ्या नाजूक विद्युत केबल्सच असतात. गाढ झोपेत हातावर डोकं ठेवून झोपल्यास किंवा बराच वेळ एकाच कुशीवर झोपल्यास हाताच्या नसांवर जास्त ताण येतो. हातातील रेडियल नर्व्ह आणि कोपऱ्याजवळील अल्नार नर्व्हवर दाब आल्याने मेंदूकडे जाणारे संदेश काही काळ थांबतात, आणि त्यामुळेच मुंग्या येणे, उष्णता जाणवणे किंवा टोचल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.
रक्तभिसरणात अडथळा आल्यानेही शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसतात. रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर मानेच्या मणक्यातील नसा दबल्या गेल्यास खांदा, हात आणि बोटांपर्यंत मुंग्या पसरतात. तर पाठीच्या खालच्या मणक्यातील वेदनांमुळे नितंब आणि पायांत सुन्नपणा जाणवतो.
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. हात-पायांच्या नसा खराब होऊन पेरिफेरल न्यूरोपॅथी होते. विटामिन बी १२ च्या कमतरतेचाही परिणाम मणक्यावर आणि शरीरातील नसांवर होतो. चुकीच्या बसण्या-झोपण्याच्या सवयींमुळे किंवा रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे शरीराला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. एकाच स्थितीत बराच वेळ झोपून राहिल्यास सांध्यांतील स्नेहद्रव कमी होत जातो.
एक बाजू सुन्न पडणे, कमजोरी वाटणे, चेहरा वाकडा होणे किंवा बोलताना अडखळणे ही स्ट्रोकशी संबंधित लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.
शरीराच्या एका बाजूचे स्नायू कमकुवत होणे, चेहरा एका बाजूला वाकडा होणे, बोलताना शब्द अडखळणे, गोंधळ उडणे, अचानक दिसेनासे होणे, चक्कर येणे किंवा शरीराचा तोल जाणे अशी लक्षणे दिसल्यास क्षणाचाही उशीर न करता डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. तसेच लघवी किंवा शौचावरील नियंत्रण अचानक सुटणे, तीव्र पाठदुखीसोबत पायातील ताकद कमी होणे, हात किंवा पाय अचानक थंड, फिकट किंवा निळसर पडणे, शरीराची हालचाल न होणे अशी लक्षणे दिसल्यासही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.