विरारमध्ये भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
विरार पूर्वेतील जांभूळपाडा गावात सोमवारी (5 ऑक्टोबर) रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा थारवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट एका घरावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की घराची भिंत कोसळली आणि घरमालक सुभाष जयराम सुतार जखमी झाले. घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकींचेही या अपघातात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. थारमधून अंकित मिश्रा (वय 26) आणि त्याचा मित्र राज यादव (वय 24) प्रवास करत होते. दोघेही नालासोपारा पूर्व परिसरात राहणारे असल्याचे सांगण्यात आले आहे. ते भाताणे येथून भालिवलीमार्गे मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या दिशेने जात होते.
सुभाष सुतार जांभुळपाडा येथील घर क्रमांक ४८/ब मध्ये पत्नी सुवर्णा आणि मुलगा आकाश यांच्यासह राहतात. त्यांच्या घरासमोरून भालीवली ते भाताणेच्या दिशेने जाणारा सिमेंटचा रस्ता आहे. घराच्या मुख्य दरवाजासमोर पत्र्याचे शेड आहे आणि या शेडखाली त्यांच्या टीव्हीएस ज्युपिटर (एमएच ४८/सीव्ही ४१५२) आणि हिरो एक्स्ट्रीम (एमएच ४८/डीएल २८८१) या दोन दुचाकी उभ्या होत्या. रात्री ११.३० ते ११.४५च्या दरम्यान महिंद्रा थार (एमएच ४८/डीएक्स ७८९८) ही जीप भाताणेच्या दिशेकडून भालीवलीकडे जात होती.
थार जांभूळपाडा गावाच्या हद्दीत आल्यावर चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी थेट सुभाष सुतार यांच्या घराला धडकली आणि घराची भिंत कोसळली. भिंतीच्या विटा अंगावर पडल्याने सुतार जखमी झाले. घराच्या इतर भिंतींनाही तडे गेल्याचे सांगण्यात येत आहे. थारची धडक घरासमोरच्या दोन्ही दुचाकींनाही बसली आणि त्यांचे नुकसान झाले. रात्री अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी थारमधील अंकित मिश्रा आणि राज यादव या दोघांना ताब्यात घेतले. दोघेही दारू पिलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, त्याबद्दलची अधिकृत वैद्यकीय पुष्टी अजून समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून अपघात नेमका कसा झाला, गाडीचा वेग किती होता आणि चालकाने दारू प्यायली होती का, यासह इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे. घरमालक सुतार यांच्या घराचे आणि दुचाकींचे झालेले नुकसान तसेच भिंतींना गेलेले तडे यांचीही नोंद या तपासात घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे जांभूळपाडा गावात एकच खळबळ उडाली.