सोनीपतमध्ये पाळीव पिटबुलचा सहा महिन्यांच्या बाळावर हल्ला, मालक बघत उभा
हरियाणातील सोनीपतमध्ये शेजाऱ्याच्या पाळीव पिटबुल कुत्र्याने सहा महिन्यांच्या बाळावर हल्ला केला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हरियाणाच्या सोनीपतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाळीव पिटबुल कुत्र्याने अवघ्या सहा महिन्यांच्या बाळावर हल्ला केला. ही घटना इतकी भयानक आहे की व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. या प्रकरणात सगळ्यात संतापजनक बाब म्हणजे कुत्रा बाळाला चावत असताना त्याचा मालक अगदी निवांतपणे बाजूला उभा होता, त्याला कसलीच काळजी वाटत नव्हती.
दुपारच्या वेळेत ती महिला आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन शेजाऱ्यांशी गप्पा मारत उभी होती. शेजाऱ्यांच्या घराचा दरवाजा उघडताच आतून एक कुत्रा वेगाने धावत आला आणि त्याने बाळावर क्रूर हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की कुत्रा बाळाला सोडतच नाही, आणि त्याचा मालक म्हणजे ज्याला डॉग पेरेंट म्हटलं जातं, तो शांतपणे उभा राहून हे सगळं बघत होता. त्याने लगेच कुत्र्याला बाजूला करण्याचाही प्रयत्न केला नाही. बाळ गंभीर जखमी झालं असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
अंकुर सिंह नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, सोनीपत हरियाणात एका पिटबुल पाळीव कुत्र्याने सहा महिन्यांच्या मुलावर हल्ला केला. कुत्रा बाळावर क्रूरपणे हल्ला करत असताना त्याचा मालक किती निवांत होता, हे बघा. बाळ गंभीर जखमी असून रुग्णालयात दाखल आहे. तरीही डॉग लव्हर्स याचं समर्थन करत कुत्रा भुकेला असेल वगैरे कारणं देतील, असं त्याने नमूद केलं.
पिटबुल ही कुत्र्याची जात मुळातच अत्यंत आक्रमक मानली जाते. अनेक देशांमध्ये या जातीचे कुत्रे पाळण्यावर बंदी आहे, कारण हे कुत्रे कधी कसे वागतील याचा भरवसा नसतो आणि एकदा पकड घेतली की सोडत नाहीत. भारतातही यापूर्वी अनेकदा पिटबुलने लहान मुलांवर आणि मोठ्या माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत, तरीही लोक हौस म्हणून हे कुत्रे घरात पाळतात.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी जबाबदारी त्या मालकाची आहे. लहान बाळ असलेल्या घरात इतका धोकादायक कुत्रा पाळणे आणि त्याला मोकळे सोडणे हा निव्वळ बेजबाबदारपणा आहे. पाळीव कुत्रा कोणावर हल्ला करत असेल, तर त्याची संपूर्ण जबाबदारी मालकावरच येते. त्यामुळे या मालकावर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी होत आहे.
सरकारने पिटबुलसारख्या धोकादायक जातींवर बंदी घालावी किंवा त्यासाठी कडक नियम बनवावेत, अशीही मागणी पुढे येत आहे. सध्या सहा महिन्यांचं ते बाळ रुग्णालयात जीवन-मरणाच्या दारात आहे. भविष्यात असं कोणाच्याही घरात घडू नये, यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे. हौसेखातर कुत्रा पाळण्यापूर्वी नीट विचार करणं आवश्यक आहे, कारण एका चुकीमुळे एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो.