मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:46 IST

सोलापुरात दहा हजार चौ.फूट पालिका जागेवरून वाद, विरोधानंतर प्रस्ताव तहकूब

सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील मौल्यवान जागा सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली दिली जात असल्याचा आरोप, स्थायी समितीत गोंधळानंतर सभापतींना प्रस्ताव तहकूब करावा लागला.

सोलापुरात दहा हजार चौ.फूट पालिका जागेवरून वाद, विरोधानंतर प्रस्ताव तहकूब
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिकेच्या दहा हजार चौरस फूट जागेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाच्या नावाखाली ही जागा एका संस्थेच्या घशात घातली जात असल्याचा आरोप होत असून, या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर आला होता.

सिद्धेश्वर पेठेतील सिटी सर्व्हे क्रमांक ६०४२ या ठिकाणची जागा चित्तोड राजपूत लोहार समाजाच्या उमाजी संस्थेला सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमासाठी देण्याचा प्रस्ताव सभासद भारतसिंग बडूरवाले आणि बिज्जू प्रधाने यांनी मांडला होता, असे सांगितले जाते. सभासदांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि एमआयएमचे गटनेते अजहर हुंडेकरी यांनी तीव्र आक्षेप घेत विरोध केला. त्यामुळे अखेर स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकूते यांना हा प्रस्ताव तहकूब करावा लागला.

याच जागेवर आणखी काही संघटनांनीही दावा केल्याचे समजते, त्यामुळे जागा नेमकी कोणाच्या ताब्यात द्यायची किंवा कोणासाठी वापरायची, यावरून प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. महापालिका वर्तुळात या जागेसाठी विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. काही पदाधिकारी आपल्या समाजातील नगरसेवकांना पुढे करून आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनात हेलपाटे मारत असल्याचीही चर्चा असून, त्यातूनच संबंधित संस्थेच्या नावाने प्रस्ताव आणून जागा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

ही जागा शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी असल्याने दहा हजार चौरस फुटांच्या या भूखंडाचे भविष्यातील व्यावसायिक व विकासात्मक मूल्य मोठे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला जागा देण्यापूर्वी महापालिकेने सर्व दावे, मालकी हक्क, आरक्षण, वापराचा उद्देश आणि कायदेशीर बाबींची सखोल तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

या जागेवरील जुन्या इमारतीला धोकादायक असल्याची नोटीस देण्यात आली होती, त्यानंतर परवानगीच्या आधारे इमारत जमीनदोस्त करण्यात आली, असे सांगितले जाते. सध्या या ठिकाणी सपाट मैदान आहे. इमारत पाडण्यापासून पुढील प्रक्रियेपर्यंत मराठा समाजातील एका व्यक्तीने किंवा व्यक्तींनी विशेष पुढाकार घेतल्याची चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत दहा हजार चौरस फुटांची जागा नेमकी कोणाच्या मालकीची, एकाच जागेवर विविध संस्थांचे दावे कसे, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमासाठी जागा देण्याचे निकष कोणते आणि इमारत पाडल्यानंतर जागेचा पुढील वापर काय, असे सवाल उपस्थित करण्यात आले. महापालिकेच्या मौल्यवान जागेचे वाटप करण्यापूर्वी खुली प्रक्रिया राबवली का, असाही प्रश्न विचारला गेला.

स्थायी समितीत प्रस्तावाला विरोध झाल्याने हा विषय सध्या तहकूब झाला असला, तरी महापालिकेच्या मोक्याच्या जागेभोवती सुरू असलेल्या हालचालींमुळे प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना गटनेते अमोल शिंदे म्हणाले की, महापालिकेची जागा समाजाच्या गोंडस नावाखाली भाडेतत्त्वावर देणे योग्य नाही, म्हणून बहुमताच्या जोरावर पास झालेला ठराव गोंधळामुळे थांबवावा लागला. महापालिकेची कोणतीही जागा कोणालाही देण्यास आमचा तीव्र विरोध आहे, अशी त्यांनी भूमिका मांडली आणि या संदर्भात तीव्र आंदोलन उभे करू, असा इशाराही दिला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ