सोलापुरात ११ ऑक्टोबरपासून आयटीएफ पुरुष टेनिस स्पर्धा, नऊ देशांचे खेळाडू उतरणार
२५ हजार डॉलर बक्षीस रकमेची आयटीएफ पुरुष टेनिस स्पर्धा सोलापुरात ११ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणार असून भारतीय खेळाडूंना एटीपी गुण मिळवण्याची संधी आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सोलापुरात ११ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय टेनिसचा थरार रंगणार आहे. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या (एसडीएलटीए) वतीने 'एमएसएलटीए-एसडीएलटीए आयटीएफ २५ हजार डॉलर बक्षीस रकमेची पुरुष टेनिस स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय टेनिस संघटना (एआयटीए) आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांची या स्पर्धेला मान्यता आहे.
महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने ही स्पर्धा ११ ते १८ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. सामने सोलापुरातील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील एमएसएलटीए टेनिस कोर्टवर खेळवले जातील.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या स्पर्धेत अनेक अव्वल टेनिसपटू सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची तसेच महत्त्वाचे एटीपी गुण आणि पारितोषिकाची रक्कम मिळवण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे. भारतीय टेनिसपटूंना आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पुढे जाण्यासाठी व्यासपीठ देणे, हा स्पर्धेच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेचे संचालक आणि एमएसएलटीएचे सहसचिव राजीव देसाई यांनी सांगितले की, भारतासह अमेरिका, ट्युनिशिया, जपान, थायलंड, स्वित्झर्लंड, कझाकस्तान, नेपाळ आणि स्वीडन या नऊ देशांतील खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मुख्य ड्रॉमध्ये करण सिंग, दिग्विजय प्रताप सिंग, सिद्धार्थ रावत, एस. डी. प्रज्वल देव, मनीष सुरेशकुमार आणि देव जाविआ हे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. वाइल्ड कार्डबाबत देसाई यांनी सांगितले की, अर्णव पापरकर आणि अनुप बंगार्गी यांना मुख्य ड्रॉसाठी, तर प्रज्वल तिवारी, वंश नांदल आणि मायंद तिवारी यांना पात्रता फेरीसाठी वाइल्ड कार्ड देण्यात आले आहे.
पात्रता फेरीचे सामने ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी होतील, तर मुख्य ड्रॉमधील सामने १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान खेळवले जातील. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते होणार आहे.
गुणांची विभागणी अशी आहे : विजेत्या खेळाडूला करंडक आणि ५० एटीपी गुण, तर उपविजेत्याला करंडक आणि ३० एटीपी गुण मिळतील. उपांत्य फेरीतील खेळाडूंना १८, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना ९, त्यापूर्वीच्या फेरीतील खेळाडूंना ५, तर पहिल्या फेरीतील खेळाडूंना १ एटीपी गुण देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी इराणच्या नेदा काझेमी यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून नियुक्ती झाली आहे. पुण्याच्या लीना नागेशकर सहाय्यक सामना पर्यवेक्षक म्हणून, तर राजीव देसाई स्पर्धा संचालक म्हणून काम पाहतील. रोहित बालगवी (कर्नाटक), शैलेश तांबे (मुंबई), सेल्वराज कोट्टेश्वरन (चेन्नई), रितुराज बसंत (आसाम), सैबल बॅनर्जी (कोलकाता) आणि करण सिंग (दिल्ली) यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य ड्रॉमधील मानांकित खेळाडू असे : १. गॅरेट जॉन्स (अमेरिका, ४४२), २. करण सिंग (भारत, ४८३), ३. अझीझ ओउका (ट्युनिशिया, ५३१), ४. दिग्विजय प्रताप सिंग (भारत, ५५१), ५. सिद्धार्थ रावत (भारत, ६५४), ६. एस. डी. प्रज्वल देव (भारत, ६५९), ७. रियुकी मात्सुदा (जपान, ६७९), ८. मनीष सुरेशकुमार (भारत, ७०१).