चेन्नई सुपर किंग्सशी मायकल हसी यांचा प्रवास संपला; आयपीएल २०२७ आधी प्रशिक्षक मंडळात मोठे बदल
फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांचा कार्यकाळ संपला असून फ्रँचायझीने त्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. झहीर खान यांच्या नियुक्तीनंतर सीएसकेच्या प्रशिक्षक मंडळात बदल सुरू आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
इंडियन प्रीमियर लीगचा २० वा हंगाम २०२७ मध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्सच्या संघात आणि प्रशिक्षक मंडळात मोठे बदल होताना दिसत आहेत. फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांचा कार्यकाळ संपला असून फ्रँचायझीने त्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव यंदाच्या वर्षाअखेरीस गोव्यात होणार आहे. अनेक फ्रँचायझींनी या लिलावासाठी आपली तयारी आधीच सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्सनेही त्या दिशेने पावले उचलली असून आयपीएल २०२७ च्या आधी संघात मोठे बदल केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांची सीएसकेच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर प्रशिक्षक मंडळात काही मोठे बदल होऊ शकतात, असे वृत्त समोर आले होते. आता हसी यांच्या बाबतीतला निर्णय त्याच पार्श्वभूमीवर आला आहे.
वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाने पुढच्या हंगामाआधी मायकल हसी यांना फलंदाजी प्रशिक्षकपदावरून हटवण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. हसी यांनी अनेक वर्षे सीएसकेसाठी क्रिकेट खेळले. त्यानंतर २०१८ मध्ये ते फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाले आणि तेव्हापासून ते याच भूमिकेत चेन्नई सुपर किंग्ससोबत होते.
आयपीएल २०२६ नंतर स्टीफन फ्लेमिंग यांचा चेन्नई सुपर किंग्समधील कार्यकाळ संपला. त्यांच्या जागी झहीर खान यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सीएसकेने झहीर खान यांना स्वतःचा कोचिंग स्टाफ तयार करण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे वृत्त समोर आले.
झहीर खान यांच्याव्यतिरिक्त मोहित शर्मा हेही सीएसकेमध्ये सामील झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमन यांना हटवून माजी भारतीय वेगवान गोलंदाज मोहित शर्मा यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. वृत्तानुसार, सीएसकेचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स फॉस्टर यांचे भवितव्यही धोक्यात आले असून तेही फ्रँचायझी सोडून जाण्याची शक्यता आहे.
स्टीफन फ्लेमिंग यांनी सीएसकेची साथ सोडल्यानंतर इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका स्वीकारली. आता हसी हेही इंग्लंड कसोटी संघाच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये सामील होऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे. २०२२ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकासाठी त्यांनी इंग्लंडसोबत सल्लागार म्हणून काम केले होते आणि इंग्लंडच्या विजयात योगदान दिले होते.