ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ५८ विद्यार्थ्यांची २४ तासांची जलतरण मॅरेथॉन आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये
सलग २४ तास चाललेल्या रिले जलतरण मॅरेथॉनमध्ये ५८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि ८ व ९ ऑक्टोबरदरम्यानच्या या उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपली नोंद केली आहे. सलग २४ तास चाललेल्या रिले जलतरण मॅरेथॉनमध्ये शाळेच्या ५८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. हा उपक्रम ८ आणि ९ ऑक्टोबरदरम्यान पार पडला.
आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षक डॉ. चित्रा जैन यांनी या कामगिरीचे कौतुक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना, शिस्त आणि जिद्द यांचा प्रेरणादायी संदेश दिला. २४ तासांच्या रिले जलतरण मॅरेथॉनची नोंद झाल्यानंतर त्या बोलत होत्या.
शाळेचे चेअरमन संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी आणि अनिष्का मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. प्राचार्य संगीता राऊतजी यांनी त्यासाठी सहकार्य केले. क्रीडा समन्वयक गिरीश टोकसे आणि रोहित पाटील यांच्यावर नियोजनाची जबाबदारी होती.
विद्यार्थ्यांना पाण्यात उतरवण्याआधी त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम जलतरण शिक्षक स्मिता काथवे, रुपाली अनप, विशाल नरवडे, उमा जोशी, अनिकेत सरदार आणि कपिलेश हारणे यांनी केले. या सर्वांचे नियोजन, प्रशिक्षण आणि सहकार्य यामुळेच विद्यार्थ्यांना २४ तासांच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रम नोंदवण्याची संधी मिळाली.
संगीता राऊतजी म्हणाल्या की, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना फक्त विजयाचा आनंद मिळाला नाही, तर आयुष्यातील आव्हानांवर मात करण्याचा आत्मविश्वासही मिळाला. कोणत्याही संकटाचा सामना करताना सातत्य, जिद्द आणि बांधिलकी महत्त्वाची असते, हा जीवनमंत्र विद्यार्थ्यांनी या अनुभवातून घेतला.
त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा दिवस खेळ, ध्यान आणि योगाने सुरू होतो. अभ्यासासोबत आरोग्याची काळजी घेणे आणि जीवनात समतोल राखणे महत्त्वाचे आहे. समर्पण, बांधिलकी आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही आव्हानावर मात करता येते आणि हाच समतोल ध्रुवच्या यशाचा आधार आहे.
"या ऐतिहासिक क्षणामागे प्रत्येक विद्यार्थ्याची मेहनत, प्रशिक्षकांचे समर्पण आणि संपूर्ण क्रीडा पथकाचे योगदान आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक, प्रशिक्षक आणि आयोजकांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. सर्वांच्या एकजुटीमुळेच हा गौरवशाली क्षण साकार झाला असून, ही कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद आहे," असे संगीता राऊतजी, प्राचार्य, ध्रुव ग्लोबल स्कूल, यांनी म्हटले.
डॉ. चित्रा जैन, परीक्षक, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, म्हणाल्या, "सलग २४ तासांची जलतरण मॅरेथॉन पूर्ण करणे ही छोटी उपलब्धी नाही. त्यासाठी ताकद, सहनशक्ती आणि हार न मानण्याची वृत्ती आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी मेहनत, समर्पण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा विक्रम साध्य केला. या यशासाठी सर्व जलतरणपटू, प्रशिक्षक, शिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन."
चौथीत शिकणारी विद्यार्थिनी भूमी पाटील हिनेही आपला अनुभव सांगितला. जलतरण मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे हा तिच्यासाठी आयुष्यातील सर्वांत मोठा अनुभव आहे. तिचा स्लॉट दुपारी अडीच ते तीन असा होता. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे तिला खूप छान वाटले. शिट्टी वाजेपर्यंत पोहत राहण्याची जिद्द मनात होती, असे तिने सांगितले. हा अनुभव तिच्यासाठी कायम अविस्मरणीय राहील.