कमी भांडवलात धंदा सुरू करायचाय? फक्त 5000 रुपयांत सुरू होतील हे 7 व्यवसाय
स्वतःचा व्यवसाय सुरू करायला मोठी रक्कम लागतेच असं नाही. साबण, अगरबत्ती, कागदी पिशव्या ते पेट केअर किट अशा 7 धंद्यांची सुरुवात फक्त 5,000 रुपयांत करता येते.
स्वतःचा धंदा सुरू करायचं स्वप्न बघणाऱ्या अनेकांना वाटतं की त्यासाठी लाखो रुपयांचं भांडवल लागतं. पण प्रत्यक्षात तसं काही नाही. फार कमी पैशात छोटा व्यवसाय सुरू करून, नंतर तो हळूहळू मोठा करता येतो. रोजच्या गरजेशी निगडित असे व्यवसाय बाजारात नेहमीच चालतात, कारण त्यांना मागणी कधीच कमी होत नाही. अवघ्या 5,000 रुपयांच्या भांडवलात सुरू करता येतील असे 7 व्यवसाय पुढे सांगितले आहेत.
पहिला पर्याय म्हणजे घरच्या घरी साबण बनवण्याचा धंदा. यासाठी सोप बेस, सुगंधी तेलं, रंग, साचे आणि पॅकिंगचं सामान लागतं. सुरुवातीला कमी संख्येने वेगवेगळ्या डिझाईनचे आणि सुगंधाचे साबण बनवून आजूबाजूच्या लोकांना विकता येतात. पुढे सोशल मीडियावरून ग्राहकांची संख्या वाढवता येते.
दुसरा धंदा म्हणजे अगरबत्ती तयार करणं. पूजेसाठी आणि रोजच्या वापरासाठी जवळपास प्रत्येक घरात अगरबत्ती लागतेच. यासाठी लागणारा कच्चा माल, सुगंधी द्रव्ये आणि पॅकिंग साहित्य आणून लहान प्रमाणात काम सुरू करता येतं. तयार अगरबत्ती जवळच्या दुकानांना आणि परिसरातल्या लोकांना सहज विकता येते.
तिसरा पर्याय म्हणजे कागदी पिशव्या बनवणं. प्लास्टिक पिशव्यांवर निर्बंध असल्यामुळे लहान-मोठ्या दुकानांना पेपर बॅगची मागणी नेहमी असते. घरूनच वेगवेगळ्या आकाराच्या आणि डिझाईनच्या कागदी पिशव्या बनवून किराणा दुकानं, बेकरी, कपड्यांची दुकानं आणि गिफ्ट शॉप्समधून थेट ऑर्डर घेता येतात.
चौथा धंदा मेणबत्ती बनवण्याचा. आता साध्या मेणबत्त्यांबरोबरच सजावटीच्या आणि सुगंधी मेणबत्त्यांनाही खूप मागणी आहे. मेण, वात, साचे, सुगंधी द्रव्ये आणि पॅकिंग साहित्य घेऊन कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करता येतो. सण-उत्सवाच्या आणि गिफ्टिंगच्या दिवसांत या मेणबत्त्यांना चांगली मागणी येऊन नफाही चांगला मिळतो.
पाचवा पर्याय म्हणजे इमर्जन्सी होम किट विकणं. टेप, डिंक, दोरा, रबर बँड, छोटी कात्री आणि केबल टाय अशा छोट्या वस्तूंची अचानक गरज प्रत्येक घरात भासते. या सगळ्या वस्तू एकत्र करून एक कॉम्पॅक्ट होम किट तयार करून विकता येते. ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या किट डिझाईन करता येतात.
सहावा धंदा म्हणजे मूव्हिंग हाऊस पॅकिंग सर्व्हिस. घर बदलताना सामानाची आवराआवर आणि पॅकिंग करणं हे खूप कष्टाचं आणि वेळखाऊ काम असतं. अशा वेळी लोकांच्या घरी जाऊन सामान नीट वर्गीकृत करणं, सुरक्षित पॅक करणं आणि बॉक्सवर लेबल लावणं ही सेवा देता येते. यासाठी सुरुवातीचा खर्च मुख्यतः पॅकिंग साहित्य आणि गरजेच्या टूल्सवरच होतो.
सातवा आणि शेवटचा पर्याय म्हणजे पेट केअर किटची मंथली डिलिव्हरी. घरात पाळीव प्राणी पाळणाऱ्या लोकांना दर महिन्याला अनेक गोष्टी लागतात. पेट वाईप्स, ग्रूमिंग अॅक्सेसरीज, पूप बॅग्स आणि इतर आवश्यक सामानाची छोटी किट तयार करून ही सर्व्हिस देता येते. ग्राहकाच्या गरजेनुसार मासिक पॅकेज बनवून ही किट थेट घरपोच पोहोचवता येते.