सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
07:36 IST

ग्वालियरमध्ये शीतला माता मंदिराजवळ ट्रक गर्दीत घुसला, १२ भाविकांचा मृत्यू, ३९ जखमी

नवरात्रीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत धान्याने भरलेला ट्रक घुसल्याने मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे १२ जणांचा मृत्यू झाला, तर ३९ जण जखमी झाले आहेत.

ग्वालियरमध्ये शीतला माता मंदिराजवळ ट्रक गर्दीत घुसला, १२ भाविकांचा मृत्यू, ३९ जखमी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवरात्रीच्या उत्सवात देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे मोठे संकट कोसळले. शीतला माता मंदिराच्या मार्गावर धान्याने भरलेला एक ट्रक अनियंत्रित झाला आणि भाविकांच्या गर्दीत घुसला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीमुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत शीतला माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. छिनोरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार आहे. या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असल्याचेही सांगण्यात आले आहे. तरीही मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास धान्याने भरलेला ट्रक या मार्गावर आला.

पोलिसांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चालकाने बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तीव्र उतारामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित ट्रक वेगाने मंदिर परिसराकडे धावला. त्याने रस्त्याकडेची दुकाने आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांना धडक दिली. त्यानंतर ट्रक मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आणि गेटवर जाऊन आदळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी आक्रोश सुरू झाला आणि मदतीसाठी लोकांची धावपळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकांमधून जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. ग्वालियरचे एसएसपी धर्मवीर सिंह यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ३९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच ते सहा जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. काही जखमींना फ्रॅक्चर झाले असून इतरांवरही उपचार सुरू आहेत.

जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १८ किलोमीटरवर असलेल्या ऐतिहासिक शीतला माता मंदिराजवळ टेकडी उतरताना ट्रक अनियंत्रित झाल्याचे सांगण्यात आले. जखमींना जे. ए. रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

या दुर्घटनेत कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात बचावकार्य राबवण्यात आले असून पोलीस दुर्घटनेच्या कारणांचा तपास करत आहेत. नवरात्रीच्या काळात मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असताना हा अपघात घडल्याने सुरक्षेचा आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ