भैरवनाथ मंदिर परिसरात काँक्रीटीकरण का? ठाकरे गटाचा सवाल, ठेकेदारावर कारवाईची मागणी
सातारा येथील गडकर आळीतील श्री. पेढ्याचा भैरवनाथ मंदिर परिसरातील काँक्रीटीकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन दिले असून चौकशी आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
सातारा : गडकर आळीतील ग्रामदैवत श्री. पेढ्याचा भैरवनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामावरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या परिसरात आधी नैसर्गिक पाऊलवाटा, माती आणि हिरवाई होती. ती काँक्रीटच्या विळख्यात का आणली, असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
या गटाने नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन दिले. मंदिर परिसराची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी आणि काँक्रीटीकरणाच्या कामाची तांत्रिक तसेच निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. हे काम सध्या वादाचा विषय बनले आहे.
शहरप्रमुख प्रणव सावंत यांच्या पुढाकाराने गडकर आळीतील ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी नगराध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी काँक्रीटीकरणापूर्वीची आणि नंतरची छायाचित्रे दाखवली. त्यावरून मंदिर परिसराचे मूळ नैसर्गिक स्वरूप बदलले, असा दावा करण्यात आला. नैसर्गिक पाऊलवाटा असताना काँक्रीट घालण्याची नेमकी काय गरज होती, असा प्रश्न विचारण्यात आला. या कामाचा आराखडा कोणी तयार केला, कोणत्या तांत्रिक निकषांवर मंजुरी देण्यात आली आणि कोणत्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले गेले, याचा खुलासा करावा, अशीही मागणी करण्यात आली.
सार्वजनिक निधीतून होणारे काम केवळ दिसायला आकर्षक असून चालणार नाही, तर ते दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारे असायला हवे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी, वापरलेले साहित्य, कामाची गुणवत्ता आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. कामात अनियमितता किंवा निकृष्टपणा आढळला, तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
मंदिर परिसरातील वृक्षारोपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. किती झाडे लावली, त्यापैकी किती जगली आणि त्यांच्या संगोपनासाठी किती खर्च झाला, याचा हिशेब सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय मंदिराचे पावित्र्य, भाविकांची सुरक्षितता आणि परिसरातील शिस्त कायम राखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
"विकासाच्या नावाखाली श्रद्धास्थानाचे नैसर्गिक अस्तित्वच संपवू नये," अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. निवेदनातील या सर्व मागण्यांकडे आता नगराध्यक्ष आणि प्रशासन कसे पाहते, याकडे गडकर आळीतील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.