मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

सातारा जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांची धावपळ

सातारा जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांची धावपळ छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

मुख्य न्यायाधीशांच्या अधिकृत ई-मेलवर आलेल्या धमकीनंतर इमारत रिकामी करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने सुमारे दीड तास तपासणी केली.

सातारा जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी थेट मुख्य न्यायाधीशांच्या अधिकृत ई-मेलवर आला. त्यामुळे सातारा जिल्ह्याची पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. दुपारी ३.१५ वाजता न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणला जाईल, असा इशारा या ई-मेलमधून देण्यात आला होता.

हा धमकीचा ई-मेल सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मिळाला. न्यायालय प्रशासनाने त्याची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना दिल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे विश्वजीत घोडके, सातारा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन मेत्रे आणि सायबर विभागाचे निरीक्षक जय गायकवाड न्यायालयात दाखल झाले. त्यांच्याबरोबर बॉम्बशोधक पथकासह मोठा पोलीस फौजफाटाही होता.

या गंभीर प्रकारानंतर न्यायालय प्रशासनाने तातडीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि नागरिक यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे न्यायालय परिसरात एकच धावपळ उडाली.

त्या वेळी न्यायालयाच्या वेगवेगळ्या दालनांत नेहमीचे कामकाज सुरू होते. काही ठिकाणी महत्त्वाच्या सुनावण्या सुरू होत्या, तर काही न्यायालयांत चॅप्टर केसेस चालू होत्या. मात्र, अचानक इमारत रिकामी करण्याची सूचना मिळताच न्यायालयीन कामकाज थांबवण्यात आले. न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना तातडीने बाहेर काढल्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी झाली. या गोंधळाचा परिणाम सातारा-कोरेगाव मार्गावरील वाहतुकीवरही झाला.

दरम्यान, बॉम्बशोधक पथकाने बॉम्ब डिटेक्टरच्या मदतीने न्यायालयाचा प्रत्येक मजला, सर्व दालने आणि आजूबाजूचा परिसर कसून तपासला. ही तपासणी सुमारे दीड तास चालली. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

मुख्य न्यायाधीशांनाच थेट धमकीचा ई-मेल आल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला आहे. ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागे कोण आहे आणि धमकी देण्याचा उद्देश काय, याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. ई-मेलचा आयपी अॅड्रेस शोधण्यावर तपास यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

सातारा जिल्हा न्यायालयात घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालयीन वर्तुळात तसेच सातारा शहरातही काही काळ भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ