सर्वपित्री अमावस्येला या गोष्टींचे दान शुभ, अमावस्या शनिवार १० ऑक्टोबरला
पितृपक्षातील शेवटची तिथी असलेली सर्वपित्री अमावस्या शनिवार, १० ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी काळे तीळ, अन्न, वस्त्र, गूळ आणि चांदीचे दान शुभ मानले जाते.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सर्वपित्री अमावस्या शनिवार, १० ऑक्टोबर रोजी आहे. ही तिथी पितृपक्षातील शेवटची आणि खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. ज्या लोकांच्या पूर्वजांची तिथी माहीत नाही, किंवा ज्यांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते.
श्राद्धासोबतच या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी केलेल्या दानामुळे सर्व पितरांचे आशीर्वाद मिळतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सर्वपित्री अमावस्येला कोणत्या गोष्टींचे दान करावे, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
सर्व पितृ अमावस्या हा पितृ पक्षाचा शेवटचा दिवस असून, सर्व ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांसाठी श्राद्ध करण्यासाठी तो सर्वात महत्त्वाचा मानला जातो. गरुड पुराणानुसार, एखाद्या व्यक्तीला पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल किंवा ती व्यक्ती विशिष्ट तारखेला पूर्वजांसाठी श्राद्ध करू शकत नसेल, तर ती व्यक्ती सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करून पुण्य मिळवू शकते.
सर्वपित्री अमावस्येला काळ्या तिळाचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी काळे तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतात आणि जीवनात येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. यासोबतच पितरांच्या आशीर्वादासोबत तुमचे आरोग्यही चांगले राहील, असे सांगितले जाते.
हिंदू धर्मात अन्नदानाला महादान मानले जाते. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अन्नाचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी गहू, तांदूळ, डाळ, फळ अशा गोष्टी तुम्ही दान करू शकता. या गोष्टी दान केल्याने पितरांसोबत देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे.
सर्वपित्री अमावस्येला वस्त्रांचे दान केल्याने पितरांना मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. या दिवशी धोती, कुर्ता, पांघरूण अशा गोष्टींचे दान करता येते. धार्मिक श्रद्धेनुसार वस्त्रांचे दान केल्याने मान सन्मानाची प्राप्ती होते.
सर्वपित्री अमावस्येला गुळाचे दान केल्याने अपत्यप्राप्ती होते आणि जीवनात येणारे अडथळेही दूर होतात, असे मानले जाते. गुळाचे दान केल्याने पितरांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतात आणि कुटुंबात सुख शांती राहते, अशी श्रद्धा आहे.
चांदीला शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार चांदीचे दान केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते. या दिवशी तुम्ही चांदीच्या भांड्याचेही दान करू शकता. चांदीचे दान केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ शकते आणि मानसिक शांती मिळू शकते.
धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई अशा विषयांवरील लेख आणि बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.