सर्वधर्माचा देव हाच राष्ट्रसंतांचा गुरुदेव : डॉ. धनराज खानोरकर
ब्रह्मपुरीतील कुर्झा वार्डात तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याचे अनावरण झाले.
ब्रह्मपुरी येथील कुर्झा वार्डात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या अनावरणाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध वक्ते, कवी आणि लेखक डॉ धनराज खानोरकर यांनी बोलताना महाराजांच्या कार्याचा काव्यमय शब्दांत आढावा घेतला.
खानोरकर म्हणाले, "वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजेरी भजनाने सारा भारत देश जिंकला. जपानपर्यंत या खंजेरीच्या बादशाहाने आपल्या भजनाने लोकजागृती केली. राष्ट्रनिष्ठा, विज्ञाननिष्ठ, धर्मनिरपेक्षता आणि ग्रामस्वराज्यासाठी ते शेवटपर्यंत झटले. भजन, प्रवचन, ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामरक्षण, स्वयंपूर्णता, महिलोन्नती, ग्रामस्वच्छता, ग्रामस्वराज्यावर सुंदर विवेचन केले. त्यांच्या प्रेरणेने अनेक गाव स्वयंपूर्ण झाली. महाराज सर्वधर्माचे माहेर होते. सर्वधर्माचा देव हा राष्ट्रसंतांचा गुरुदेव होता."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. रानपाट रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात हा पुतळा उभारला असून तो मूर्तिकार डूबा लाखे यांनी बनवला आहे.
अनावरणाच्या वेळी माजी नगरसेवक विलास विखार, दीपकभाऊ उराडे, नगरसेवक चंद्रकांत बावनकुळे, नगरसेवक प्रकाश खोब्रागडे, नगरसेविका तलमले, सुनिल विखार, नितीन आंबोरकर, प्रा शंकर लांजेवार, साखरकर, रविंद्र उराडे, उमेश बावनकुळे, प्रकाश बावनकुळे आदी मान्यवर हजर होते. अनेकांनी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुल सहारे आणि मोहनिश उराडे यांनी केले, तर किरण फटिंग यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी वार्डातील गुरुदेव भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.