उद्यानात रानडुकराच्या शिकारीदरम्यान गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; डॉक्टरसह चौघांना अटक
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रानडुकराच्या शिकारीसाठी गेलेल्या गटातील गोळीबारात विजय सापटे यांचा मृत्यू झाला. खोटे मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरसह चार जणांना काशीगाव पोलिसांनी अटक केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एका गटात गोळीबार झाला आणि त्यात विजय सुखरू सापटे (वय 60 वर्षे) यांचा मृत्यू झाला. सापटे हे मीरा-भाईंदर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी होते. ही घटना ठाणे येथील चेना बीट परिसरात घडली. गटाकडून चुकून गोळीबार झाला, असे सांगण्यात आले आहे.
या गोळीबारात आणखी दोन जण जखमी झाले आहेत. कुणाल शेलार आणि कल्पेश धंगाळा अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती पोलिसांपासून लपवण्यात आली, असे समोर आले आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी सापटे यांच्या मृतदेहावर पहाटेच अंत्यविधी केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, या आरोपावरून तसेच हत्येच्या कलमांनुसार कारवाई करून काही जणांना आणि एका डॉक्टरला अटक करण्यात आली.
एका खाजगी डॉक्टरकडून हृदयविकाराच्या झटक्याचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यात आले. काशीगाव पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा तपास केला असून खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरसह चार जणांना अटक झाली आहे. महेश गायकर, कातोड, बिस्तूर आणि लाभड अशी अटक केलेल्यांची नावे समोर आली आहेत.
डॉ. राजेश पालांडे यांनी व्हिडिओ कॉलवरून मृतदेह पाहून सापटे यांचा मृत्यू घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करणारे प्रमाणपत्र दिले, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात त्यांनी याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. पालांडे यांचे भाईंदरमध्ये आशिष मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे आणि ते होमिओपॅथीमध्ये एम.डी. आहेत.
अटक झालेले पालांडे शिवसेनेच्या शिंदे गटात सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत, असेही सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती आणि त्या नियुक्तीचे प्रमाणपत्र सरनाईक यांच्या हस्ते देण्यात आले होते, अशीही माहिती आहे.
गोळीबारात शस्त्र कोणी वापरले, ते कोणाचे होते आणि त्याचा परवाना होता का, याची चौकशी सुरू आहे. उद्यान प्रशासनाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे.
मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 01 आणि काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.