वर्गात विद्यार्थ्याच्या डोक्यावर शिक्षकाने वाजवला तबला, व्हिडिओ व्हायरल होताच निलंबन
उत्तर प्रदेशातील सैफई येथील बरौली प्राथमिक शाळेत टक्कल केलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर शिक्षकाने तबला वाजवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
उत्तर प्रदेशातील एका शाळेतील शिक्षकाचा वर्गातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शिक्षक एका विद्यार्थ्याच्या डोक्यावर तबला वाजवल्यासारखे हात मारताना दिसतात. हा प्रसंग फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो इंटरनेटवर पसरल्यानंतर संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील सैफई येथील बरौली प्राथमिक शाळेत घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये एक शिक्षक टक्कल केलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर जोरजोरात हात फिरवत तबला वाजवताना दिसतात. त्या वेळी वर्गातली इतर मुले हे दृश्य पाहून हसत होती. व्हिडिओतील शिक्षकाचे नाव दिनेश कुमार माथूर असल्याचे सांगितले जात आहे.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातले नाते खूप आदराचे मानले जाते. आपले भविष्य घडवण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते आणि चांगले काय, वाईट काय हे शिक्षकच शिकवत असतात. पण शिक्षकच मुलाची थट्टा करायला लागले तर काय, असा प्रश्न या व्हिडिओमुळे अनेकांना पडला आहे.
लहान मुलांमध्ये टक्कल ही गोष्ट खूप नाजूक असते. एखाद्याचे टक्कल पाहून इतर मुले त्याची खिल्ली उडवतात, त्याला चिडवायला सुरुवात करतात. अशा वेळी शिक्षकाने मुलांना समजावून सांगायला हवे. पण इथे शिक्षकच मुलाला हसण्याचा विषय बनवताना दिसले.
सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ शिक्षकाने स्वतः आपल्या एक्स अकाउंटवर शेअर केला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. लोकांनी शाळेवर आणि शिक्षकावर टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर शिक्षकावर कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात आले.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरही शेअर करण्यात आला असून त्याच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. अनेक यूजर्सनी त्या व्हिडिओवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एका यूजरने म्हटले की, "निर्लज्ज माणूस आणि हा शिक्षक आहे". दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, "ला टक्कल करायला लावले पाहिजे; त्यानंतर दुसऱ्या एखाद्या शिक्षकाने त्याला अगदी अशाच प्रकारे बसवून त्याच्या डोक्याची तशीच अवस्था केली पाहिजे... आणि हे सर्व घडत असताना संपूर्ण शाळेने ते पाहत राहावे, त्याचे 'रील्स' बनवावेत आणि हसावे. त्याला केवळ हीच शिक्षा मिळायला हवी".