रोममध्ये गाझासाठी निषेध, धर्मगुरूंनी हाती धरले ३०० मुलांची नावे असलेले दफनवस्त्र
इटलीची राजधानी रोममध्ये धर्मगुरू आणि नन्सनी गाझा, वेस्ट बँक आणि लेबनॉनमधील संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या नावांचे दफनवस्त्र घेऊन मोर्चा काढला.
">
इटलीची राजधानी रोममध्ये 'Priests Against Genocide' या गटाने एक निदर्शन आयोजित केले, ज्यात सुमारे ३०० मुलांची नावे लिहिलेले पांढरे दफनवस्त्र हातात घेऊन धर्मगुरूंनी आंदोलन केले. गाझा, व्याप्त वेस्ट बँक आणि लेबनॉनमधील संघर्षात मरण पावलेल्या मुलांकडे जगाचे लक्ष वेधणे हा या मोर्च्याचा मुख्य उद्देश होता.
या निदर्शनात सहभागी झालेल्या धर्मगुरूंनी, नन्सनी आणि इतर कार्यकर्त्यांनी एक मोठे पांढरे वस्त्र हातात धरले होते, ज्यावर मुलांची नावे लिहिलेली होती. या उपक्रमामागचा हेतू आयोजकांनी असा सांगितला की, युद्धात मरण पावलेली माणसे केवळ आकडे नाहीत, तर प्रत्येक मृत व्यक्तीला एक स्वतंत्र ओळख आहे आणि एक कुटुंब आहे, हा संदेश यातून द्यायचा होता.
या आंदोलनाच्या माध्यमातून गाझासह मध्यपूर्वेतील युद्ध, त्यात होणारे नागरिकांचे मृत्यू आणि शस्त्रांच्या वापराविरोधात निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनात सहभागी झालेल्या धर्मगुरूंनी शांतता प्रस्थापित व्हावी आणि सामान्य नागरिकांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी केली. युद्धविराम लागू असतानाही हिंसाचार सुरूच असल्याचा दावा त्यांनी केला, आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला सुरू केला, त्याला आता जवळपास २ वर्ष ११ महिने झाले आहेत. या हल्ल्यामुळे जगातील सर्वात मोठा नरसंहार घडला असे जगातील अनेक देशांचे म्हणणे आहे, तर काही ठराविक देश इस्रायलच्या बाजूने उभे राहिले आहेत. या हल्ल्यात मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलांचा बळी गेला आहे, ज्यांचा या संघर्षाशी काहीही संबंध नव्हता. केवळ ते पॅलेस्टिनी आहेत म्हणून त्यांचा जीव गेला, असे यात नमूद आहे.
या हल्ल्यांमुळे गाझाचा निम्म्याहून अधिक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, गाझाला पूर्णपणे घेरून बाहेरच्या जगातून मिळणारी मदतही रोखण्यात आली आहे. उपासमारीमुळे देखील तिथे लोक मरण पावले आहेत. या सगळ्यासाठी हमासही तितकाच जबाबदार आहे जितका इस्रायल, कारण कोणत्याही देशाच्या सरकारला निष्पाप नागरिक, महिला, लहान मुले किंवा निशस्त्र आणि प्रतिकार करू न शकणाऱ्या माणसांचा जीव घेण्याचा अधिकार नाही, असे म्हटले जात आहे.
या हिंसाचारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाने नेतन्याहू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत रोममधून ख्रिस्ती धर्मगुरूंनी लहान मुलांवर झालेल्या हिंसाचाराविरोधात मोर्चा काढून आपली सहानुभूती आणि पाठिंबा व्यक्त करणे हे कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.
"