रॉ स्थापना दिन: १९६५ च्या युद्धातील गुप्तचर अपयशानंतर उभी राहिली बाह्य गुप्तचर संस्था
रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ आणि इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबी यांच्यातील फरक आणि त्यांच्यावरचे नियंत्रण कोणाचे, याचा हा आढावा.
अमेरिकेची सीआयए, इस्रायलची मोसाद, ब्रिटनची एमआय-६ आणि सोव्हिएत युनियनची केजीबी या जगातील नावाजलेल्या बाह्य गुप्तचर संस्थांबद्दल अनेकांनी ऐकलं असेल. या संस्थांनी जगभरात अनेक धोकादायक कारवाया केल्या असून आपापल्या देशांना युद्धे जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतानेही २१ सप्टेंबर १९६८ रोजी स्वतःची बाह्य गुप्तचर संस्था स्थापन केली, तिचं नाव रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ.
ही संस्था उभारण्याची गरज १९६५ च्या युद्धाच्या वेळी प्रकर्षाने जाणवली. पाकिस्तानच्या लष्करी तयारीबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे भारताला त्या युद्धात मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. त्याआधी गुप्त माहिती गोळा करण्याचं काम मुख्यतः इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबीकडे होतं, पण हे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आयबी पूर्णपणे सक्षम नव्हती. यामुळेच सरकारने बाह्य गुप्तचर माहितीसाठी वेगळी संस्था उभारण्याचा निर्णय घेतला आणि २१ सप्टेंबर १९६८ रोजी रॉ अस्तित्वात आली. आर. एन. काओ हे रॉचे पहिले आणि संस्थापक प्रमुख होते.
रॉ आणि आयबी या दोन्ही संस्थांचं काम नेमकं वेगवेगळं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रॉ बाहेरच्या देशांशी संबंधित गुप्त माहिती गोळा करते, तर आयबी प्रामुख्याने देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित माहितीवर लक्ष ठेवते. भारताच्या सुरक्षेवर आणि सामरिक हितांवर परिणाम करणाऱ्या इतर देशांच्या राजकीय, लष्करी आणि सामरिक हालचालींवर नजर ठेवणं, परदेशातून गुप्त माहिती मिळवणं आणि भारतासमोरचे बाह्य धोके ओळखणं ही कामं रॉमार्फत केली जातात. उदाहरणार्थ पाकिस्तानची लष्करी तैनाती किंवा चीनच्या लष्करी हालचालींची माहिती गोळा करणं हे रॉच्या कार्यक्षेत्रात येतं.
याउलट आयबी देशांतर्गत दहशतवाद, हेरगिरी, फुटीरतावाद आणि जातीय तणाव यांसारख्या अंतर्गत सुरक्षेच्या धोक्यांशी संबंधित माहिती गोळा करते. भारतातील दहशतवादी नेटवर्क किंवा हेरगिरीच्या कारवायांबाबतची माहिती जमा करणं हे आयबीचं काम आहे. आयबी राज्यातल्या पोलिसांसह इतर सुरक्षा संस्थांसोबतही गुप्त माहितीची देवाणघेवाण करते.
या दोन्ही एजन्सींमध्ये प्रशासकीय रचनेच्या बाबतीतही मोठा फरक आहे. रॉ ही कॅबिनेट सचिवालयाच्या अंतर्गत काम करते. कॅबिनेट सचिवालय हा केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्रशासकीय यंत्रणेचा भाग असून त्याचं नेतृत्व कॅबिनेट सचिव करतात. रॉच्या प्रमुखाला सचिव म्हणजेच रिसर्च असं संबोधलं जातं. त्यामुळे रॉ थेट गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. रॉशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि कॅबिनेट सचिवालय या पातळीवर समन्वय साधला जातो.
आयबी मात्र गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रमुख अंतर्गत गुप्तचर संस्था आहे. गृह मंत्रालयाची अंतर्गत सुरक्षा शाखा आयबीशी संबंधित प्रशासकीय आणि आर्थिक बाबी हाताळते. पण याचा अर्थ आयबीचं काम केवळ गृहमंत्र्यांपुरतं मर्यादित आहे असा होत नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये दोन्ही एजन्सींकडची माहिती सर्वोच्च राजकीय आणि सुरक्षा यंत्रणेपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रॉ आणि आयबी यांच्यातला समन्वय खूप महत्त्वाचा ठरतो.