रॉ आणि आयबी प्रमुखांचा पगार सारखाच, पण भत्त्यांमध्ये फरक
देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रॉ आणि आयबी या दोन गुप्तचर संस्थांच्या प्रमुखांची बेसिक सॅलरी सारखीच असते, मात्र भत्त्यांमुळे हातात येणाऱ्या पगारात फरक पडतो.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉ आणि इंटेलिजेंस ब्युरो म्हणजेच आयबी या दोन संस्था सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. रॉचे काम परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे हे असते, तर आयबी देशांतर्गत सुरक्षा आणि गुप्त हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम करते. दोन्ही संस्थांच्या प्रमुखांची पदे सरकारमध्ये अत्यंत संवेदनशील आणि जबाबदारीची मानली जातात. या दोन्ही पदांच्या पगारात एक तांत्रिक फरक असल्याची रंजक बाब समोर आली आहे.
एका संस्थेच्या प्रमुखाला दुसऱ्यापेक्षा जास्त पगार मिळतो असे वाटत असेल तर ते खरे नाही. नियमांनुसार रॉ प्रमुख आणि आयबी डायरेक्टर या दोघांची बेसिक सॅलरी अगदी सारखीच असते. भारत सरकारने ७ व्या वेतन आयोगांतर्गत दोन्ही शीर्ष पदांना अपेक्स स्केल म्हणजेच पे लेव्हल १७/१८ मध्ये ठेवले आहे. या स्केलनुसार दोन्ही अधिकाऱ्यांना दरमहा २ लाख २५ हजार रुपये इतका निश्चित बेसिक पगार मिळतो. हे वेतनमान भारताच्या कॅबिनेट सेक्रेटरी किंवा भारत सरकारच्या सचिव रँकच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीचे आहे.
बेसिक पगार म्हणजेच २.२५ लाख रुपये दोघांचाही सारखा असला, तरी हातात येणाऱ्या एकूण पगारात थोडा फरक पडतो. याचे कारण दोन्ही संस्थांच्या कामाची पद्धत आणि त्यांना मिळणारे वेगवेगळे भत्ते हे आहे.
रॉचे मुख्य काम देशाबाहेर परदेशात गुप्त माहिती गोळा करणे असल्यामुळे रॉच्या अधिकाऱ्यांना आणि प्रमुखाला विशेष फॉरेन सर्व्हिंग अलाउंस म्हणजेच परदेशी सेवा भत्ता आणि सिक्रेसी अलाउंस मिळतो. हे भत्ते, महागाई भत्ता आणि इतर सुविधा एकत्र जोडल्या की रॉ प्रमुखाचा एकूण मासिक पगार ३.५ लाख ते ४ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.
आयबीचे मुख्य काम देशातच राहून अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवाया सांभाळणे असते. आयबीच्या डायरेक्टरला बेसिक पगारासोबत २०% स्पेशल सिक्युरिटी अलाउंस म्हणजेच विशेष सुरक्षा भत्ता, महागाई भत्ता आणि इतर सरकारी सुविधा मिळतात. आयबीचे काम प्रामुख्याने देशांतर्गत असल्यामुळे रॉप्रमाणे परदेशी भत्ते यात समाविष्ट नाहीत.
आयबी ही जगातील सर्वात जुन्या गुप्तचर संस्थांपैकी एक मानली जाते. ब्रिटिशांच्या काळात डायरेक्टर ऑफ इंटेलिजेंस ब्युरोला दरमहा ३,५०० रुपये पगार मिळत असे, जो स्वातंत्र्यानंतर कमी होऊन २,५०० रुपये झाला होता. तरीही हे देशातील एकमेव पोलीस अधिकारी पद होते ज्याला अपेक्स पे स्केल मिळत होता. पुढच्या काळात बीएसएफ आणि सीआरपीएफ प्रमुखांनाही हाच दर्जा देण्यात आला. अशा प्रकारे पगाराच्या बाबतीत रॉ आणि आयबीचे प्रमुख जवळपास सारख्याच पातळीवर आहेत, फक्त भत्त्यांमुळे हातात येणाऱ्या रकमेत फरक पडतो.