RRB NTPC पदवीधर भरती: १,६८८ जागांसाठी अर्ज १५ ऑक्टोबरपासून, शेवटची तारीख १३ नोव्हेंबर
रेल्वे भरती बोर्डाने एनटीपीसी अंडरग्रॅज्युएट भरती २०२६ ची शॉर्ट नोटिफिकेशन जारी केली असून, विविध झोनमधील १,६८८ जागांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) एनटीपीसी अंडरग्रॅज्युएट भरती २०२६ बाबत शॉर्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या भरतीतून देशातील वेगवेगळ्या झोनमध्ये नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या (NTPC) अंडरग्रॅज्युएट लेव्हलच्या एकूण १,६८८ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीला CEN 07/2026 असे नाव देण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून उमेदवारांना १३ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरतीचे सविस्तर नोटिफिकेशन रेल्वेकडून १४ ऑक्टोबरला जाहीर केले जाणार आहे.
या भरतीत चार प्रकारची पदे असणार आहेत. ट्रेन क्लर्कच्या १८८ जागा, कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या ७०० जागा, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टच्या २०० जागा आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या ६०० जागा अशा एकूण १,६८८ जागा या भरतीत निश्चित करण्यात आल्या आहेत. कमर्शियल कम तिकीट क्लर्क पदासाठी सुरुवातीचा पगार २१,७०० रुपये ठरवण्यात आला आहे, तर ट्रेन क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांसाठी सुरुवातीचा पगार १९,९०० रुपये असणार आहे. या सर्व पदांवर ७ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार पगार आणि इतर भत्ते दिले जाणार आहेत.
या अंडरग्रॅज्युएट पदांसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे गरजेचे आहे. यातील अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोन पदांसाठी कॉम्प्युटरवर हिंदी किंवा इंग्रजीत टायपिंग येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२७ रोजी १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे लागेल. सरकारी नियमांप्रमाणे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आरआरबीच्या अधिकृत पोर्टलवर किंवा संबंधित झोनच्या आरआरबी वेबसाइटवर जाऊन आधी नवीन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील भरायचे आहेत. फॉर्मसोबत फोटो, स्वाक्षरी आणि गरजेप्रमाणे प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर ठरलेली फी भरून अर्ज सबमिट करता येईल. अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रत डाऊनलोड करून जपून ठेवावी, असे उमेदवारांना सांगण्यात आले आहे.
अर्ज फीबाबत सांगायचे झाले तर जनरल आणि ओबीसी उमेदवारांना ५०० रुपये फी भरावी लागेल. एससी, एसटी, माजी सैनिक, महिला, दिव्यांग, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना किमान २५० रुपये फी भरावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील सीबीटीत बसणाऱ्या जनरल आणि ओबीसी उमेदवारांना बँक चार्जेस वजा जाता ४०० रुपये परत मिळतील, तर सवलतीच्या श्रेणीतील उमेदवारांना सीबीटी १ मध्ये बसल्यावर २५० रुपये परत केले जातील.
निवड प्रक्रियेत उमेदवारांना अनेक टप्प्यांतून जावे लागणार आहे. सीबीटी १ या पहिल्या परीक्षेत १०० प्रश्न असतील आणि ती सोडवण्यासाठी ९० मिनिटांचा वेळ मिळेल. यात जनरल अवेअरनेसचे ४०, गणिताचे ३० आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे ३० प्रश्न विचारले जातील. सीबीटी १ मध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना सीबीटी २ ही परीक्षा द्यावी लागेल, ज्यात १२० प्रश्न असतील. यात जनरल अवेअरनेसचे ५०, गणिताचे ३५ आणि रिझनिंगचे ३५ प्रश्न असतील. ज्या पदांसाठी टायपिंग गरजेचे आहे त्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टायपिंग स्किल टेस्टही द्यावी लागेल. या सगळ्यानंतर शेवटच्या टप्प्यात कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.