सेंट्रल रेल्वेची तिकिट चेकिंग मोहीम: तिकिटासोबत ओरिजनल ओळखपत्र बंधनकारक
सेंट्रल रेल्वेने १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत खास 'तिकिट चेकिंग अभियान' सुरू केले आहे. सणासुदीच्या काळात अनेक जण मोठी सुट्टी काढून आपल्या कुटुंबाला भेटायला जाण्याचा प्लॅन करतात. त्यामुळे ऑक्टोबरपासून रेल्वेने प्रवास करण्याचा विचार असेल, तर आधीच थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. ही मोहीम महिनाभर चालणार असल्याने या काळात प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने तिच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे.
या अभियानाचा सर्वात मोठा नियम 'वन टिकट, वन ओरिजिनल आयडी' असा आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की आता प्रवाशाकडे फक्त तिकीट असणे पुरेसे ठरणार नाही. त्याच्याकडे ओरिजनल ओळखपत्रही असणे गरजेचे आहे. म्हणजेच तिकीट आणि ओळखपत्र, दोन्ही प्रवासात सोबत हवेत.
तपासणीच्या वेळी तुमच्याकडे ओळखपत्र नसेल, तर फक्त तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा प्रवास गैर मानला जाईल. त्यासाठी दंडही भरावा लागू शकतो. म्हणून ओळखपत्र किंवा कोणताही आयडी आतापासूनच पाकिटात ठेवा. म्हणजे टीटीईने विचारले की तो थेट दाखवता येईल. प्रवास सुलभ व्हावा यासाठी रेल्वेच्या नियमांचे पालन करा, असे यात सांगण्यात आले आहे.
कोटा किंवा खास कन्सेशनवर प्रवास करणाऱ्यांना ओरिजनल कागदपत्रे दाखवून आधी तसा हक्क सिद्ध करावा लागेल. असे न केल्यास त्यांच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय जे लोक रोज रेल्वेच्या ई-पासने प्रवास करत आहेत, त्यांनाही आपले ओळखपत्र टीटीईला दाखवणे आवश्यक आहे.
ही तपासणी फक्त स्लीपर किंवा एसी गाड्यांपुरती मर्यादित नाही. जनरल कोचसाठीही तेच नियम लागू आहेत. तुम्ही जनरल डब्यातून प्रवास करत असाल, तरी टीटीई तुमच्या तिकिटाची पडताळणी करेल. गरज भासली तर टीटीई ॲपच्या मदतीने तिकिटाचे व्हेरिफिकेशनही करू शकतो.
रेल्वेच्या कामकाजात होणारी फसवणूक रोखणे, हा या अभियानामागचा मुख्य हेतू असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
थोडक्यात, ३१ ऑक्टोबरपर्यंत सेंट्रल रेल्वेवरून प्रवास करताना तिकिटासोबत ओरिजनल ओळखपत्र जवळ ठेवा. कोटा, कन्सेशन आणि ई-पासवर प्रवास करणाऱ्यांनी संबंधित कागदपत्रेही सोबत ठेवावीत. स्लीपर, एसी आणि जनरल अशा सर्व डब्यांतील प्रवाशांची तिकिटे तपासली जाणार आहेत.