रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक
मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. रविवार 27 सप्टेंबरला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार असून पश्चिम रेल्वेवर शनिवार रात्री जम्बो ब्लॉक असणार आहे.
मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांनी रविवारच्या प्रवासाचं आधीच नियोजन करून ठेवावं, कारण विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांमुळे रविवार, 27 सप्टेंबर रोजी मुंबई लोकलच्या वेगवेगळ्या मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर हा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत आणि काही गाड्या धीम्या किंवा जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 या वेळेत मेगाब्लॉक असेल. या वेळेत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाउन जलद लोकल माटुंगा स्टेशनवर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा ते मुलुंडदरम्यान सगळ्या स्टेशनांवर थांबतील. त्यानंतर ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्टेशनवर पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद लोकलही मुलुंड स्टेशनवर अप धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत, त्यामुळे जलद लोकलचा प्रवास नेहमीपेक्षा जास्त वेळ घेऊ शकतो. याशिवाय खोपोलीहून दुपारी 1.48 वाजता सुटणारी लोकल आता दुपारी 2.06 वाजता सुटणार आहे.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकच्या काळात सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाउन लोकल आणि पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल रद्द करण्यात येतील. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी याच वेळेत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येतील. ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावरील लोकल सेवा मात्र रविवारच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसारच सुरू राहणार आहे.
पश्चिम रेल्वेवरही प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आहे. वसई रोड ते भाईंदरदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर शनिवार 26 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12.30 ते रविवार पहाटे 4.30 या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धीम्या मार्गावरील सगळ्या लोकल विरार/वसई रोड आणि बोरिवली/भाईंदरदरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील, त्यामुळे या लोकल काही स्टेशनांवर थांबणार नाहीत. महत्त्वाचं म्हणजे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.
या मेगाब्लॉकमुळे रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना बदलांना सामोरं जावं लागणार आहे. हार्बर मार्गावर काही लोकल रद्द असल्यामुळे प्रवाशांनी उपलब्ध स्पेशल लोकल आणि पर्यायी मार्गांचा विचार करावा, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचं अद्ययावत वेळापत्रक तपासून घ्यावं आणि प्रवासासाठी थोडा जास्त वेळ हातात ठेवावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.