रावणाच्या सिंहासनावर चार महिने, पुष्पक विमानावर सहा वर्षे; 'रामायण'च्या सेटची चर्चा
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'मधील रावणाचे सिंहासन, शूर्पणखेचा रथ आणि पुष्पक विमान यांच्या निर्मितीचे तपशील कला दिग्दर्शक रमेश अंधाळे यांनी सांगितले आहेत.
रणबीर कपूर यांच्या 'रामायण' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित आणि भव्य चित्रपटांपैकी हा एक मानला जातो. नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हा भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे एकूण बजेट अंदाजे ४ हजार कोटी रुपये असल्याची चर्चा आहे. पहिल्या भागाचे बजेट सुमारे १,६०० कोटी रुपये असल्याचा अंदाज असून, त्यातला मोठा खर्च व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी (CGI) आणि प्रोडक्शन डिझाइनवर झाला आहे. भव्य सेट आणि आकर्षक दृश्यांसाठी निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
चित्रपटाचे कला दिग्दर्शक रमेश अंधाळे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सेट आणि काही खास गोष्टींच्या निर्मितीबद्दल सांगितले. त्यांनी दिलेल्या तपशिलांवरून या चित्रपटासाठी किती मेहनत आणि खर्च झाला आहे, याचा अंदाज येतो.
रावणाचे सिंहासन हे चित्रपटाच्या खास आकर्षणांपैकी एक असेल. रावणाने कुबेराकडून सिंहासन बळकावले आणि लंकेवर विजय मिळवला, त्यानंतरचे दृश्य चित्रपटात दाखवले जाणार आहे. त्या दृश्यासाठीच्या सिंहासनावर तब्बल चार महिने काम चालले. आधी डिझाइननुसार त्याचे क्ले मॉडेल तयार केले गेले आणि त्यानंतर फायबर वापरून प्रत्यक्ष सिंहासन बनवले गेले.
हे सिंहासन खऱ्या सोन्यासारखे दिसावे म्हणून त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आला. रमेश अंधाळे यांच्या माहितीनुसार, हे भव्य सिंहासन तयार करायला जवळपास १ कोटी रुपये खर्च आला.
शूर्पणखेचा रथ ही चित्रपटातील आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. शूर्पणखेची भूमिका राकुल प्रीत सिंग साकारत आहेत. विशेष म्हणजे, रावणाच्या सिंहासनापेक्षा या रथावर जास्त खर्च झाला आहे. रथासाठी अंदाजे १.५ कोटी रुपये लागले आणि तो तयार व्हायला तीन महिने गेले.
एवढा खर्च करूनही हा रथ चित्रपटात फक्त एकाच दृश्यात दिसणार आहे. पंचवटीच्या जंगलात शूर्पणखा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना भेटायला येते, त्या प्रसंगात हा रथ पाहायला मिळेल. एका दृश्यासाठी निर्मात्यांनी इतकी मोठी रक्कम खर्च केल्याने याची चर्चा होत आहे.
पुष्पक विमान हेही चित्रपटातील महत्त्वाचे आकर्षण असेल. दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या विमानाच्या डिझाइनवर आणि निर्मितीवर जवळपास सहा वर्षे काम केले. हे विमान सुमारे ५० फूट रुंद असल्याचे सांगितले जाते. आकार मोठा असल्याने स्टुडिओमध्ये ते एकाच वेळी उभे करणे शक्य नव्हते, म्हणून त्याचे चार वेगवेगळे भाग बनवले गेले. प्रत्येक भागासाठी अंदाजे ४० ते ५० दिवस लागले.
रावणाचे सोन्याचे सिंहासन, शूर्पणखेचा महागडा रथ आणि पुष्पक विमान यांमुळे चित्रपटाच्या प्रोडक्शन डिझाइनची चर्चा रंगली आहे. प्रत्येक दृश्य भव्य आणि अविस्मरणीय व्हावे म्हणून निर्माते आणि संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली आहे. या कलाकृती मोठ्या पडद्यावर कशा दिसतील, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.