रणबीर कपूरचा 'रामायण' जगभरात ५ नोव्हेंबरला, भारतातील तारीख अजून जाहीर नाही
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'ची परदेशातील रिलीज तारीख एक दिवस आधी आणली गेली आहे. भारतातील तारीख मात्र अजून अधिकृतपणे सांगितलेली नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची चर्चा गेली दोन वर्षे सुरू आहे. मोठे कलाकार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे आणि सगळे या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाच्या परदेशातील प्रदर्शनाच्या तारखेत पुन्हा एकदा बदल झाल्याची नवी माहिती समोर आली आहे.
आधी हा चित्रपट परदेशात ६ नोव्हेंबरला रिलीज होणार होता. मात्र सोनी पिक्चर्स जर्मनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून सांगण्यात आले की, 'रामायण' आता एक दिवस आधी, म्हणजे ५ नोव्हेंबर २०२६ ला जगभरात थिएटरमध्ये येईल. परदेशात चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित केला जातो, म्हणून ६ नोव्हेंबरची तारीख ठरवण्यात आली होती.
परदेशातील ५ नोव्हेंबर ही तारीख पक्की झाली असली, तरी भारतातील प्रदर्शनाची तारीख मेकर्सनी अजून अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. भारतात चित्रपट दिवाळीमध्ये रिलीज होईल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. म्हणजेच आधी परदेशात आणि त्यानंतर भारतात असा काहीतरी प्लॅन केला गेला असावा.
हा चित्रपट म्हणजे भारतीय सिनेमाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. त्याचे बजेट ४००० कोटी इतके असल्याचे सांगितले जाते. एवढ्या मोठ्या बजेटचा सिनेमा आजपर्यंत भारतात बनलेला नाही, त्यामुळे रिलीजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा जगभरात ५९,००० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर लागणार आहे, जो एक विक्रम ठरेल.
याआधी सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर ३० जुलैला भारतात पहाटे ४:१५ वाजता, ब्रह्म मुहूर्तावर रिलीज झाला होता.
या चित्रपटाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याची स्टारकास्ट. रणबीर कपूर भगवान श्रीरामांची भूमिका करत आहेत, तर साई पल्लवी माता सीता साकारत आहेत. KGF फेम यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सनी देओल हनुमान, रवी दुबे लक्ष्मण, तर आपला मराठमोळा आदिनाथ कोठारे भरताच्या भूमिकेत आहेत. अरुण गोविल राजा दशरथ, इंदिरा कृष्णन राणी कौशल्या, लारा दत्ता कैकेयी आणि शीबा चड्डा मंथरा साकारत आहेत.
एवढी मोठी आणि अनुभवी टीम एकाच सिनेमात येणे ही मोठी गोष्ट आहे. सनी देओलला हनुमानाच्या रूपात पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत, तर यश रावण कसा साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
रिलीज डेट एक दिवस मागे-पुढे झाली असली, तरी प्रेक्षकांची उत्सुकता कमी झालेली नाही. आता सगळ्यांचे डोळे दिवाळीच्या मुहूर्ताकडे लागले आहेत.