राजुऱ्यात एपीआयची लोकप्रतिनिधींशी अरेरावी, सर्वपक्षीय पदाधिकारी संतापले
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर नगरसेविकेच्या कुटुंबाशी अरेरावी आणि बेपत्ता मुलीच्या आईशी अपमानास्पद वागणुकीचा आरोप, चौकशीची मागणी.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशनमध्ये काम करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. महिला नगरसेविका मंगला मोकडे यांच्या कुटुंबीयांशी अरेरावी आणि शिवीगाळ केल्याचा, तसेच बेपत्ता मुलीच्या आईशी अपमानास्पद बोलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
राजुरा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना याबाबत तक्रार अर्ज देण्यात आला आहे. तक्रारीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी एका कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर कुणाल मोकडे यांना चौकशीसाठी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते. कुणाल यांच्याच विनंतीवरून राजुरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हरजितसिंग संधू हे दुपारी १ ते ३ या वेळेत विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी अरेरावीची भाषा वापरत "कोण धोटे, कोण भोंगळे, सर्व राजकारणी #$@## आहेत" अशी अशोभनीय भाषा वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय कुणाल मोकडे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दलही अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.
दुसरीकडे, १८ ऑगस्ट २०२६ रोजी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये १४ वर्षांची हर्षाली सत्यपाल मोहूले ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाच्या तपास अधिकारी असलेल्या योगेश पाटील यांच्याकडे मुलीची आई अश्विनी सत्यपाल मोहूले यांनी मुलीबाबत विचारणा केली असता, समाधानकारक माहिती देण्याऐवजी त्यांच्याशी अपमानास्पद पद्धतीने बोलण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे. मुलीच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत असलेल्या आईला संवेदनशीलतेने माहिती देण्याऐवजी गैरशब्द वापरण्यात आल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांनी म्हटले आहे की, सामान्य नागरिक, विशेषतः महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे न्यायाच्या अपेक्षेने पोलीस स्टेशनमध्ये येतात. अशा वेळी त्यांच्याशी संवेदनशील, सन्मानपूर्वक आणि कायदेशीर पद्धतीने वागणे अपेक्षित असताना गैरवर्तनाचे आरोप होत असतील, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपांची सत्यता तपासावी, दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर व विभागीय कारवाई करावी आणि अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास गांभीर्याने व तत्परतेने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीची प्रत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, खासदार प्रतिभाताई धानोरकर, राजुरा विधानसभा आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच राजुरा पोलीस उपविभागीय अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास तालुका काँग्रेस कमिटी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तक्रार अर्जातून देण्यात आला आहे.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, संतोष देरकर, प्रणय धोटे, भाजप पदाधिकारी व नगरसेवक भुपेश मेश्राम, नगरसेवक एजाज अहमद, पुणम गिरसावळे, अन्नुताई संधू, निता बानकर, फरीना सय्यद, मंगला मोकडे, पोर्णिमा सोयाम, सामाजिक कार्यकर्त्या संगीता धोटे, सुमित्राबाई कुचनकर, मंगला हांडे, प्रणय लांडे, मधुकर झाडे आणि संघपाल देठे यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते.