युरोपशी संघर्ष वाढवण्याचे कारण नाही, पुतिन यांचे स्पष्ट वक्तव्य
रशिया आणि युरोपीय देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये पत्रकारांशी बोलताना युरोपशी संघर्ष वाढवण्याचे कोणतेही ठोस कारण नसल्याचे सांगितले.
पूर्वी सोव्हियत युनियन असताना युक्रेन हा रशियाचा भाग होता. सोव्हियत युनियनचे विघटन झाल्यानंतर युक्रेन रशियापासून वेगळा झाला. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचे मूळ कारण म्हणजे युक्रेन युरोपीय देशांकडे झुकत असल्याचे मानले जाते. यामुळे नाटो देशांची मदत युक्रेनला मिळेल आणि त्या निमित्ताने नाटो रशियाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल, अशी शक्यता अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी आधीच व्यक्त केली होती. युक्रेनला रशियाकडून धोका असल्याचे हे अभ्यासक सांगत होते.
रशिया युक्रेनवर हल्ला करेल अशी शंका आधीपासूनच होती, आणि प्रत्यक्षात तसेच घडले. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा युक्रेनने आपली चिकाटी आणि निश्चय दाखवत रशियाला सडेतोड उत्तर दिले. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे पुरवली आणि नाटोने विमाने घेऊन मदत केली. या युद्धात युक्रेनसोबतच रशियालाही मोठे नुकसान सोसावे लागले. आधीच अशा तोट्यात असताना दुसऱ्या बाजूला युरोपवर हल्ला करून युद्धाचा आणखी एक मोर्चा उघडणे पुतिन यांना सध्या शक्य नसल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले असताना भारतासारख्या मोठ्या देशाने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचाही रशियावर परिणाम झाल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. रशिया युरोपसोबत कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची तयारी करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेंट पीटर्सबर्गमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की युरोपसोबत परिस्थिती चिघळवण्याचे कोणतेही ठोस कारण रशियाकडे नाही.
नाटोच्या काही युरोपीय सदस्य देशांकडून रशियाकडून भविष्यात हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी रशियाची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. मॉस्को युरोपसोबत संघर्ष करण्याची तयारी करत नसल्याचे त्यांनी सांगितले आणि रशियाकडून युरोपविरोधात परिस्थिती बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचा दावाही केला.
पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, रशिया आणि युरोपमधील परिस्थिती अधिक चिघळवण्यामागे कोणतेही ठोस कारण नाही. त्यामुळे युरोपीय देशांनी रशियाच्या हालचालींकडे संघर्षाच्या दृष्टीने पाहू नये, असा संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला. मात्र युरोपातील काही देश रशियाच्या लष्करी क्षमतेबाबत आणि भविष्यातील हालचालींबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
रशिया आणि युरोपीय देशांमधील संबंधांवर युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम झाला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून नाटो आणि रशिया यांच्यातील तणाव वाढला आहे. युरोपीय देशांकडून युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत दिली जात असताना रशियाकडून त्याला विरोध केला जात आहे. अशा परिस्थितीत पुतिन यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. युरोपसोबत थेट संघर्ष टाळण्याची भूमिका रशियाने पुन्हा स्पष्ट केली असली, तरी युक्रेनमधील युद्धामुळे दोन्ही बाजूंमधील तणाव कायम आहे.