मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 18:38 IST

पूर्णेकर हत्या प्रकरण: पतीची सात वेळा चौकशी, आता माजी महापौर मीनाक्षी शिंदे एसआयटीसमोर

पूर्णेकर हत्या प्रकरण: पतीची सात वेळा चौकशी, आता माजी महापौर मीनाक्षी शिंदे एसआयटीसमोर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासात आता मोठी घडामोड झाली आहे. हा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या सध्याच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांची सखोल चौकशी होणार आहे.

याआधी मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची एसआयटीने सात वेळा कसून चौकशी केली होती. आता थेट माजी महापौरांनाच चौकशीसाठी बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण सध्या ठाण्यात आणि मानपाडा परिसरात सगळ्यांच्या चर्चेत आहे.

२९ सप्टेंबर रोजी रात्री साधारण ९:३० वाजता प्रदीप पूर्णेकर मानपाडा येथील आपल्या कार्यालयात बसले होते. त्या वेळी हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि चॉपरने सपासप वार करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येमागे राजकीय आणि सामाजिक वैमनस्य असल्याचा संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता.

प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे या दोघांच्या नावांचा थेट उल्लेख आहे. हा पूर्वनियोजित राजकीय कट असल्याचे सांगत, शिंदे दाम्पत्याला या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी करावे, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी लावून धरली आहे.

कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन हत्येच्या दीड तास आधीचा एक व्हिडीओही समोर आणला आहे. या व्हिडीओत सर्व आरोपी राजेंद्र शिंदे यांच्यासोबत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र मीनाक्षी शिंदे यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

तपासात आतापर्यंत एसआयटीने पूर्णेकर यांचा जुना मित्र सुभाष उर्फ पप्या शिंदे, निखिल यादव, नितेश पवार आणि इतर दोन अशा एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

तपासाचा भाग म्हणून एसआयटीने ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात राजेंद्र शिंदे आणि मुख्य आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली होती. सात वेळा झालेल्या या चौकशीत राजेंद्र शिंदे यांनी हत्येशी आपला कसलाही संबंध नसल्याचा दावा केला होता. आता मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीतून काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ