पुणे मेट्रो मार्गिका-३ देशातील पहिली पूर्णपणे महिला संचालित, १०० महिला ट्रेन पायलट
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण झालेली ही मार्गिका सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपयांतून पूर्ण झाली आहे.
पुणे मेट्रो मार्गिका-३ चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. ही मार्गिका देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार आहे. सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी मिळून ही मार्गिका चालवणार आहेत. हे अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.
पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. शहराची लोकसंख्या वाढते आहे आणि वाहतुकीची गरजही वाढत आहे. हे लक्षात घेता आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
मार्गिका-३ ही देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) उभी राहिलेली पहिली मेट्रो मार्गिका आहे. सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या मार्गिकेची पायाभरणी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच झाली होती.
दुसऱ्या टप्प्यातील चार विस्तारित मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यांचे भूमिपूजन आज होत आहे. या मार्गिका ३१ किलोमीटर लांबीच्या असून त्यांच्यावर २८ स्थानके असतील. त्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ९ हजार ८५८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
या विस्तारामुळे वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा जास्त होईल. या मार्गावरील आर. के. लक्ष्मण संग्रहालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही स्थानके अनुक्रमे 'कॉमन मॅन' आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणारी ठरतील, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) तयारीपासून मंजुरीपर्यंत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे, असे त्या म्हणाल्या. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पाला लागणारा निधी उपलब्ध करून दिला. जुलै महिन्यात त्यांनी हिंजवडीतील मेट्रो स्थानकांची पाहणी केली होती आणि कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या ४२६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ही कामे प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत पालकमंत्री म्हणून आपण स्वतः बारकाईने लक्ष घालणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.