गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:58 IST

पुण्याची गीता मालुसरे ९६ दिवसांत ट्रिपल क्राउन मिळवणारी पहिली भारतीय महिला

इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि न्यूयॉर्कमधील '२० ब्रिजेस स्विम' पूर्ण करून गीता महेश मालुसरे यांनी ओपन वॉटर स्विमिंगचा ट्रिपल क्राउन आपल्या नावावर केला.

पुण्याची गीता मालुसरे ९६ दिवसांत ट्रिपल क्राउन मिळवणारी पहिली भारतीय महिला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुण्यातील ओपन वॉटर जलतरणपटू गीता महेश मालुसरे यांनी ओपन वॉटर स्विमिंगचा 'ट्रिपल क्राउन' मिळवला आहे. इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि न्यूयॉर्कमधील '२० ब्रिजेस स्विम' या तीन मोहिमा त्यांनी अवघ्या ९६ दिवसांत पूर्ण केल्या. हा किताब मिळवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला जलतरणपटू ठरल्या आहेत.

इतक्या कमी कालावधीत ट्रिपल क्राउन पूर्ण करणाऱ्या त्या जगातील सहाव्या आणि आशियातील दुसऱ्या महिला आहेत. जगातील सात प्रमुख ओपन वॉटर स्विम्स पूर्ण करून 'क्वीन ऑफ ओशन' हा बहुमान मिळवण्याचे ध्येय गीता यांनी ठेवले आहे. ट्रिपल क्राउन हा त्या प्रवासातला एक मोठा टप्पा आहे.

या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे इंग्लिश चॅनेल. तो पार केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅटालिना चॅनेल १५ तास ४२ मिनिटांत पार केला. कॅटालिना चॅनेल पूर्ण करणाऱ्या त्या भारतातील पाचव्या महिला ठरल्या होत्या. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये मॅनहॅटन बेटाभोवतीचे सुमारे ४६ किलोमीटरचे '२० ब्रिजेस स्विम' त्यांनी ९ तास ३२ मिनिटांत पूर्ण केले. या तिन्ही आव्हानात्मक मोहिमा ९६ दिवसांच्या आत संपवून त्यांनी ट्रिपल क्राउन स्वतःच्या नावावर केला.

हा प्रवास सोपा नव्हता. इंग्लिश चॅनेलमध्ये पोहताना गीता यांना जेलीफिशचा दंश झाला. तरीही तयारी सुरू ठेवून त्या पुढच्या आव्हानांना सामोरे गेल्या. कॅटालिना चॅनेलच्या वेळी त्यांच्या दोन्ही हातांना दुखापत झाली. अनेक महिन्यांची तयारी, घेतलेले कष्ट आणि मोहिमेचे ध्येय लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतली नाही.

"प्रत्येक स्विमने मला नवा धडा दिला आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत केले. या प्रवासातील वेदना, त्याग आणि अडचणी असूनही माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता," असे गीता यांनी सांगितले. या कामगिरीत वडील, आई, आजी आणि इतर कुटुंबीयांचा पाठिंबा मोलाचा होता, असेही त्यांनी नमूद केले. प्रशिक्षक प्रतीक जावडेकर आणि शेखर खासनीस यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

'२० ब्रिजेस स्विम'साठी प्रायोजकत्व दिल्याबद्दल गीता यांनी वेंकीज (Venkys) आणि क्रांती रिअल्टर्स यांचे आभार मानले. अमेरिकेतील मोहिमेत मदत करणाऱ्या प्रीती सावंत जाधव, सुदीप जाधव, राजवीर जाधव, कौस्तुभ हळबे आणि वैष्णवी कुडले यांचेही त्यांनी आभार मानले.

"हे यश केवळ माझे नाही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांचे प्रेम, त्याग, प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळे हा प्रवास शक्य झाला," अशी भावना गीता मालुसरे यांनी व्यक्त केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ