संत्री-मोसंबीच्या सालीपासून घरच्या घरी बनवा व्हिटॅमिन सी फेसपॅक, टॅनिंग-डाग कमी होण्यास मदत
पिगमेंटेशन आणि टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज दिसत असेल तर स्वयंपाकघरातल्या साध्या पदार्थांपासून घरीच व्हिटॅमिन सी फेसपॅक तयार करता येतो.
चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसावा यासाठी अनेकजण महागडी फेशिअल ट्रीटमेंट घेतात किंवा बाजारातली वेगवेगळी स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरतात. पण त्वचेची काळजी घेताना योग्य पद्धत फॉलो केली नाही, तर समस्या कमी होण्याऐवजी उलट वाढू शकतात. वातावरणातले सतत बदल, मानसिक ताण, पुरेसे पोषक घटक न मिळणे, शरीरात पाण्याची कमतरता अशा अनेक कारणांमुळे त्वचा निस्तेज होते आणि तिच्यावरचा नैसर्गिक ग्लो कमी होतो.
चेहऱ्यावर टॅनिंग झालं, काळे डाग पडले किंवा पिगमेंटेशनची समस्या दिसू लागली, की त्यावर उपाय म्हणून लोक निरनिराळे फेसपॅक आणि महागडी प्रॉडक्ट्स वापरतात. पण त्यासाठी घराबाहेर जाऊन काही आणायची गरज नाही, स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांपासूनही असा फेसपॅक तयार करता येतो. संत्री किंवा मोसंबीच्या सालीचा वापर करून बनवलेला व्हिटॅमिन सी फेसपॅक चेहऱ्यावरचे काळे डाग, पिगमेंटेशन आणि डेड स्किन कमी करायला मदत करतो, असं सांगितलं जातं.
हा फेसपॅक बनवण्यासाठी संत्री किंवा मोसंबीच्या सालीचा रस, मुलतानी माती, टोमॅटोचा रस, कस्तुरी हळद आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एवढं साहित्य लागतं. सगळ्यात आधी मिक्सरमध्ये संत्री किंवा मोसंबीची साल घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्यातून रस काढून घ्यायचा. त्यानंतर एका वाटीत मुलतानी माती घेऊन त्यात हा सालीचा रस, टोमॅटोचा रस, कस्तुरी हळद आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालून एकजीव पेस्ट तयार करायची. ही पेस्ट ब्रशच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्यावर लावून सुमारे वीस मिनिटं तशीच ठेवायची. चेहरा पूर्ण कोरडा झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावता येतो, असं सांगण्यात आलंय.
संत्री किंवा मोसंबीच्या सालीत व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याचं म्हटलं जातं, आणि त्यामुळे टॅनिंग, काळे डाग आणि पिंपल्स कमी व्हायला मदत होते असंही सांगितलं जातं. चेहऱ्यावरचा नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठीही या सालीचा वापर उपयुक्त ठरतो. टोमॅटोमधले घटक त्वचेवरचे उघडे पोर्स बंद करून त्वचा घट्ट करतात आणि जास्तीचं तेल कमी करायला मदत करतात, तर मुरुम, डाग आणि जळजळ कमी करण्यासाठी कस्तुरी हळद प्रभावी असल्याचं सांगण्यात येतं.
हा उपाय केवळ सर्वसाधारण माहितीसाठी दिला असून, यात कुठल्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय.