गौतम अदानी पुन्हा देशातील सर्वात श्रीमंत, मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर
फोर्ब्स इंडियाच्या 2026 च्या श्रीमंतांच्या यादीत अदानी यांची संपत्ती 112.7 अब्ज डॉलर्स झाली, तर अंबानी यांची संपत्ती 86.3 अब्ज डॉलर्सवर आली.
फोर्ब्स इंडियाच्या 2026 च्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा पहिला नंबर पटकावला आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत 1.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती आता 112.7 अब्ज डॉलर्स झाली आहे, म्हणजेच 10.81 लाख कोटी रुपये.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचा नंबर यावेळी दुसरा लागला आहे. त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. अंबानी यांची संपत्ती 18.7 अब्ज डॉलर्सनी, म्हणजे 1.56 लाख कोटी रुपयांनी कमी झाली असून ती आता 86.3 अब्ज डॉलर्स राहिली आहे.
अदानी यांची संपत्ती 2022 मध्ये 150 अब्ज डॉलर्स होती आणि त्या तुलनेत आजची संपत्ती कमी आहे. तरीसुद्धा यादीत त्यांनी सगळ्यांना मागे टाकलं आहे. अदानी ग्रुप सध्या जोरात विस्तार करतोय. पुढच्या काळासाठी AI आणि त्याला लागणाऱ्या गोष्टींवर 100 अब्ज डॉलर्स गुंतवण्याचा मोठा प्लॅन ग्रुपने आखला आहे. त्यामुळे ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी आली आणि संपत्ती वाढली.
रिलायन्ससाठी मात्र हे वर्ष थोडं खराब गेलं. यामागे तीन मुख्य कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण रिटेल बिझनेस. रिलायन्स रिटेलचा नफा कमी झाला, त्यामुळे मार्जिन घटले आणि कंपनीला फटका बसला.
दुसरं कारण कच्चं तेल. बाहेरच्या देशांत तेलाचे भाव खाली वर होत आहेत आणि रिलायन्सचा तेल आणि केमिकलचा बिझनेस आहे, त्यामुळे कंपनीला तोटा झाला. तिसरं कारण कर्ज. 2025-26 मध्ये रिलायन्सवर 3,74,421 कोटी रुपयांचं कर्ज झालं, त्यामुळे गुंतवणूकदार घाबरले, शेअरची किंमत कमी झाली आणि रिलायन्सला फटका बसला.
आता एक चांगली बातमी समोर येत आहे. जिओ प्लॅटफॉर्म लवकरच त्यांचा IPO घेऊन येत आहे. त्याला परवानगी मिळाली तर 3.8 अब्ज डॉलर्सचा हा IPO देशातला सगळ्यात मोठा IPO असू शकतो.
फोर्ब्सच्या यादीत पहिल्या दहात गौतम अदानी (112.7 अब्ज डॉलर्स) आणि मुकेश अंबानी (86.3 अब्ज डॉलर्स) यांच्यानंतर सावित्री जिंदाल यांचा नंबर आहे, त्यांची संपत्ती 39.8 अब्ज डॉलर्स आहे. त्यानंतर लक्ष्मी मित्तल 34.7 अब्ज डॉलर्स, सुनील मित्तल आणि कुटुंब 32.9 अब्ज डॉलर्स, सायरस पूनावाला 28.4 अब्ज डॉलर्स आणि शिव नाडर 27.4 अब्ज डॉलर्स असे क्रम आहेत. शेवटी दिलीप सांघवी 26.3 अब्ज डॉलर्स, कुमार मंगलम बिर्ला 23.2 अब्ज डॉलर्स आणि हिंदुजा कुटुंब 21.2 अब्ज डॉलर्स आहेत.
या वर्षी 100 श्रीमंतांपैकी 50 पेक्षा जास्त जणांची संपत्ती कमी झाली आहे. सगळ्यात जास्त फटका IT कंपन्यांना बसला. जगात AI आणि ऑटोमेशन आलं आहे आणि त्यामुळे भारतीय IT कंपन्यांचं काम कमी झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून शिव नाडर, अझीम प्रेमजी आणि नारायण मूर्ती या सगळ्यांची संपत्ती कमी झाली आहे.
यंदा या यादीत येण्यासाठी 3 अब्ज डॉलर्स लागले, तर गेल्या वर्षी 3.2 अब्ज डॉलर्स लागत होते. म्हणजेच यादीतला प्रवेश थोडा सोपा झाला आहे. काही नवे चेहरे पहिल्यांदाच यादीत आले आहेत. एकूणच अदानी यांनी पुन्हा बाजी मारली असून अंबानी यांना मागे टाकलं आहे.