शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'मध्ये भोंदूबाबा बनले मनोज जोशी; पुण्यात गाणे आणि लूक समोर

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'मध्ये भोंदूबाबा बनले मनोज जोशी; पुण्यात गाणे आणि लूक समोर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या आगामी मराठी चित्रपटातील 'कॅप्टन तुम्ही मी नौका' हे गाणे आणि भोंदूबाबाचा लूक पुण्यातील लेमन ट्री हॉटेलमधील सोहळ्यात सादर झाला.

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा आगामी मराठी चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. राजकीय वर्तुळासह वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांचे लक्ष या चित्रपटाने वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विश्वातील कथित वादग्रस्त घडामोडी रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटात आहे. त्यामुळे नेमके कोणाचे बुरखे फाटणार, कोणाची गुपिते उघड होणार आणि कोणाच्या पडद्यामागील कारनाम्यांचा पर्दाफाश होणार, असे प्रश्न रसिकांना पडले आहेत. शीर्षकापासूनच रहस्याची किनार असल्याने चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथित वास्तवातील संदर्भांबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

आता चित्रपटातील 'कॅप्टन तुम्ही मी नौका, तुमच्या प्रेमाचा टेबल टाका...' हे गाणे आणि कथित भोंदूबाबाचे पहिले पोस्टर असलेला टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुण्यातील लेमन ट्री हॉटेलमध्ये झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हे गाणे सादर करण्यात आले. याच सोहळ्यात चित्रपटातील कथित भोंदूबाबाचा लूकही रिव्हील करण्यात आला. गाण्याचे बोल संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत, संगीत रोहित नागभिडे यांचे आहे आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी ते गायले आहे. साहिल साह यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून तानिया चॅटर्जी यांनी गाण्यावर नृत्य सादर केले आहे. शब्दांत सूचक अर्थ, सुरांत मिश्कीलपणा आणि ठेक्यात उपरोधाची धार असलेले हे गाणे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नाही. 'कॅप्टन' आणि 'नौका' या रूपकांतून नेतृत्व, संधीसाधूपणा आणि सत्तेभोवती फिरणाऱ्या नातेसंबंधांवर भाष्य करण्याचा प्रयत्न यात केला आहे.

गाण्याइतकाच भोंदूबाबाचा लूकही लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. काही दिवसांपासून भोंदूबाबाच्या पाठमोऱ्या गूढ पोस्टरमुळे कुतूहल होते. आता त्या पोस्टरमागचा चेहरा समोर आला आहे. या भूमिकेत अभिनेते मनोज जोशी दिसणार आहेत. त्यांनी याच गेटअपमध्ये कार्यक्रमात एन्ट्री करून सर्वांचे लक्ष वेधले. पोस्टरवरील 'पडद्याआड लपलेला वादग्रस्त चेहरा उघड होतोय...!!! लवकरच...' हा संदेश त्यामुळे खरा ठरला. त्यांच्यासोबत अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत आहेत, त्यांचा लूक याआधीच उघड झाला होता.

आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत हा चित्रपट मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली तयार झाला आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी समाजात फोफावलेल्या भोंदूगिरीवर परखड भाष्य केले आहे. कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांचे असून संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे.

चित्रपटात मनोज जोशी, दीपाली सय्यद, सुबोध भावे, उदय टिकेकर, अक्षय टंकसाळे, माधुरी पवार, सुरेश विश्वकर्मा, भारत गणेशपुरे, अनिल नगरकर, मोनिका, शिवराज वालवेकर, सिद्धेश्वर झाडबुक्के, श्रेया कुलकर्णी आणि राहुल बेलापूरकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. छायाचित्रण आकाश काकडे यांचे, कलादिग्दर्शन अक्षय आंबेकर यांचे आणि वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी यांची आहे. नेहा घोडके प्रॉडक्शन कंट्रोलर, सचिन घनवट प्रॉडक्शन हेड, यश सणस लाईन प्रोड्युसर आणि विजय म्हस्के प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ