फॅटी लिव्हर असल्यास पोळी की भात? आहारात काय बदल करावेत, जाणून घ्या
फॅटी लिव्हरचा त्रास आजकाल सर्रास दिसतो, दर तीन ते चार जणांपैकी एकाला हा त्रास असण्याची शक्यता असते. आहारात नेमके काय खावे, कोणती लक्षणे दुर्लक्षित करू नयेत आणि कोणाला जास्त धोका असतो, याबद्दल.
फॅटी लिव्हर हा आजार सध्या खूप जणांमध्ये दिसून येतोय. साधारणपणे दर तीन ते चार जणांपैकी एकाला तरी हा त्रास असण्याची शक्यता असते. भारतीयांमध्ये तर याचे प्रमाण जरा जास्तच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नियमित व्यायाम नसणे आणि आहारात साखरेचे प्रमाण जास्त असणे. शिवाय शरीरातल्या मेटाबॉलिझमशीही याचा थेट संबंध आहे.
याची गंमत अशी की फॅटी लिव्हर लवकर लक्षात येत नाही. लिव्हरमध्ये हळूहळू थोडी चरबी साठत जाते, आणि सुरुवातीला त्रास अजिबात जाणवत नाही. पण म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. फॅटी लिव्हर असेल तर नेमके काय खावे आणि काय टाळावे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
फॅटी लिव्हर असणाऱ्यांनी रोजच्या जेवणात पोळी खाणे फायद्याचे ठरते. पोळी गहू, ज्वारी किंवा नाचणीपासून बनते आणि यात फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबरयुक्त पदार्थ फॅटी लिव्हरसाठी उपयुक्त मानले जातात, त्यामुळे चपाती हा या आजारात चांगला पर्याय आहे.
याउलट भात मात्र शक्यतो टाळावा, कारण भातात फायबरचे प्रमाण कमी असते. त्यासोबतच साखर आणि मैदा यांचाही वापर पूर्णपणे कमी करायला हवा, कारण यामुळे फॅटी लिव्हर आणखी वाढण्याची शक्यता असते.
सुरुवातीच्या टप्प्यातली काही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. सतत थकवा जाणवणे, कोणतेही कारण नसताना दम लागणे, लिव्हरवर ताण आल्यावर ताकद कमी होणे आणि शरीरावर सूज येणे, ही सुरुवातीच्या फॅटी लिव्हरची किंवा मेटाबॉलिक बिघाडाची लक्षणे असू शकतात.
याशिवाय बरगडीखाली उजव्या बाजूला हलकेसे दुखणे किंवा विचित्र जडपणा जाणवणे, जेवल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे आणि गॅस होणे, हेही लिव्हरमध्ये चरबी साठल्याचे संकेत असू शकतात. लिव्हरमध्ये चरबी वाढली की पोटात जडपणा, अपचन आणि शौचालयाच्या वेळेत बदल असे अनेक त्रास जाणवू शकतात.
ज्यांची शारीरिक हालचाल कमी असते, ज्यांचे वजन जास्त असते, तसेच इन्सुलिन रेसिस्टन्स, टाइप 2 डायबेटीस, PCOS किंवा जास्त Triglycerides असणाऱ्या लोकांना फॅटी लिव्हरचा धोका जास्त असतो. जास्त साखर, प्रोसेस्ड फूड, सततचा ताण आणि दिवसभर बसून राहण्याची सवय यामुळे लिव्हरमध्ये चरबी हळूहळू साठत जाते, आणि सुरुवातीला त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
अगदी थोडेसे मद्यपानसुद्धा लिव्हरमधली चरबी वाढवू शकते आणि प्रौढांमध्ये हा त्रास वाढवू शकते. पेस्ट्री, तळलेले पदार्थ, सोडा आणि पॅकेट ज्यूस हे सर्व पदार्थ लिव्हरमध्ये सूज वाढवण्याचे मुख्य कारण ठरतात.
उशीरा जेवण केल्याने मेटाबॉलिझम बिघडतो, लिव्हरमध्ये चरबी साठते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. त्याचबरोबर सतत ताण आणि दिवसभर बसून राहण्याची सवय यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात, मेटाबॉलिझम बिघडतो आणि फॅटी लिव्हरची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.