हाँगकाँग सिक्सेसमध्ये तीन पराभवांनंतर भारताचा पहिला विजय, बांगलादेशवर शेवटच्या चेंडूवर पाच विकेट्सनी मात
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शशांक सिंहची 50 धावांची खेळी आणि कृणाल पंड्याच्या 3 विकेट्समुळे भारताने बांगलादेशला हरवले; कृणाल सामनावीर.
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत सलग तीन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाला अखेर पहिला विजय मिळवता आला. रविवारी मिशल रोड ग्राउंडवर झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा शेवटच्या चेंडूवर पाच विकेट्सनी पराभव केला.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे बांगलादेशला आधी फलंदाजी करावी लागली. त्यांनी सहा ओव्हर्समध्ये 5 बाद 116 धावा केल्या. कर्णधार अबू हिदर रोनी याने 18 चेंडूंत 8 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या. त्याच्याशिवाय हबीबुर रहमान सोहन याने 6 चेंडूंत 18, सब्बीर रहमान याने 4 चेंडूंत 13 आणि चौधरी मोहम्मद रिझवान याने 5 चेंडूंत 12 धावांचे योगदान दिले.
भारताकडून कर्णधार कृणाल पंड्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 ओव्हर्समध्ये 25 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. राहुल त्रिपाठी याला एक विकेट मिळाली.
विजयासाठी 117 धावांचे लक्ष्य होते आणि त्याचा पाठलाग करताना भारताने खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. शशांक सिंह याने 15 चेंडूंत 7 सिक्स आणि 1 चौकाराच्या मदतीने 50 धावांची खेळी केली, पण दुर्दैवाने तो रिटायर्ड हर्ट झाला. राहुल त्रिपाठी याने 12 चेंडूंत 3 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. नितीश राणा याने 4 चेंडूंत नाबाद 10 आणि राहुल तेवतिया याने 5 चेंडूंत नाबाद 16 धावांचे योगदान दिले. कृणाल पंड्या याला प्लेयर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
या स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले आहेत. भारताला 'सी' गटात ठेवण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 4 विकेट्सनी, दुसऱ्या सामन्यात युएईकडून 6 विकेट्सनी आणि तिसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून 3 विकेट्सनी भारताला पराभव पत्करावा लागला होता. रविवारी बांगलादेशवर मिळवलेल्या विजयानंतर भारत गुणतालिकेत 11 व्या स्थानी पोहोचला आहे.
या भारतीय संघात आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. तरीही आतापर्यंत संघाची कामगिरी म्हणावी तशी चांगली झालेली नाही. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून हरावे लागल्यामुळे या स्पर्धेच्या तयारीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.